प्राणी संग्रहालयातील काळवीटांवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; चार काळवीटांचा दुर्दैवी अंत
प्राणी संग्रहालय हे प्राण्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण समजलं जातं. परंतु पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चार काळविटांना मात्र महापालिकेच्या गलथानपणामुळं जीव गमवावा लागलाय.
पुणे : पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चार काळवीटं कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या काळवीटांच्या खंदकाभोवती असलेली कंपाउंड वॉल मागील वर्षी आलेल्या पुरामध्ये पडली होती. मात्र महापालिकेने भींत नव्याने बांधण्याऐवजी पडलेल्या भिंतीच्या जागी पत्रे उभारले. परंतु महापालिकेचा हा कामचलाऊपणा महागात पडला. कारण या पत्र्यांना असलेल्या फटीतून चार कुत्री काळवीटांच्या खंदकात पोहोचली आणि काळवीटांवर हल्ला चढवला. प्राणी संग्रहालय हे प्राण्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण समजलं जातं. परंतु पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चार काळविटांना मात्र महापालिकेच्या गलथानपणामुळं जीव गमवावा लागलाय. पडलेल्या कंपाउंड वॉलमधून आतमध्ये आलेल्या भटक्या कुत्र्यांनी बुधवारी सकाळी पुढं येत या हरणांना जिथं ठेवण्यात येतं ती खंदकाची दुसरी भिंत देखील ओलांडली. अचानक झालेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळं काळविटांच्या कळपात गोंधळ उडाला. इथल्या एकूण चौथीस काळविटांपैकी चार काळवीट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली .
कात्रजच्या या प्राणी संग्रहालयात सिंह , वाघ , अस्वल , कोल्हे , हत्ती , रानगवे वेगवेगळ्या प्रकारची हरणं यांच्यासह शेकडो प्राणी आहेत . मागील वर्षी कात्रज भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळं या प्राणी संग्रहालयाची कंपाउंड वॉल तुटली आणि पाणी आतमध्ये शिरलं होतं . मात्र पडलेली भिंत पुन्हा बांधण्याऐवजी महापालिकेने तिथे तात्पुरती सोय म्हणून पत्रे उभारले. वर्षभरानंतरही महापालिकेकडून भिंत बांधली गेली नाही आणि पत्र्यांना पडलेल्या फटींमधून आत येत भटक्या कुत्र्यांनी डाव साधला .
इतके संवेदनशील प्राणी इथं असताना त्यांच्या रखवालीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद दरवर्षी केली जात असताना महापालिकेला भिंतीचा पडलेला भाग वर्षभरात का बांधता आला नाही असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मात्र त्याबद्दल काही बोलण्याऐवजी गप्प राहणं पसंत करतात. अशाच एका काळवीटाची शिकार केल्याबद्दल सुपरस्टार सलमान खानला तुरुंगात जावं लागलं होत . मग आता गलथान कारभार करून या चार काळविटांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या महापालिकेतील वरिष्ठांवर कोणती कारवाई करायची असा प्रश्न विचारला जातोय.
संबंधित बातम्या :