(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आषाढीच्या दिवशीच बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक, गुन्हा दाखल
Baramati Pune Crime: बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक नवजात स्त्री जातीचं असल्याची माहिती मिळत आहे.
Baramati Pune Crime News : पुणे : बारामतीच्या (Baramati News) माळेगावातील (Malegaon) कृषी विज्ञान केंद्राच्या (Agricultural Science Centre) स्वच्छतागृहामध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra Crime News) हादरला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये मृत अर्भक सापडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हे अर्भक नवजात स्त्री जातीचं असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी बारामतीत घडलेल्या कृत्यावर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. बारामतीच्या माळेगावात एक कृषी विज्ञान केंद्र आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहामध्ये नवजात स्त्री जातीचं मृत अर्भक सापडलं. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्याद दिली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात ही घटना आली. त्यानंतर तात्काळी पोलिसांनी याबाबत कळवण्यात आलं.
आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. कृषी विज्ञान केंद्राच्या महिला स्वच्छतागृहात नवजात स्त्रीजातीचं अर्भक कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अर्भकाचा जन्म झाल्याचं लपवून ठेवून बालकाची देखभाल न करता त्याचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देश मनात ठेवूनच हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. तसेच, निर्दयी व्यक्तीनं नवजात अर्भकाला उघड्यावर टाकून दिल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे सहाय्यक व्यवस्थापक कृष्णा तावरे यांनी फिर्यादीत नमूद केलं आहे. फिर्यादीवरुन माळेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अर्भकाला जन्माला येण्यापासून रोखण्याच्या किंवा त्यांच्या जन्मानंतर त्याचा मृत्यु होण्यास कारणीभूत राहिल्याच्या कारणावरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत नवजात स्री जातीचे अर्भक अनैतिक संबंधातून तर जन्माला आलं असावं. किंवा मुलगी नको म्हणून मृत अवस्थेत ते उघड्यावर टाकलं असावं. आरोपी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येईल, असं तपास अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.