(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाना तुमच्या स्वागताला आम्ही उत्सुक, पुण्यात फ्लेक्सबाजी करत भाजपचे पटोलेंना आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पुण्यातही भाजपच्यावतीने नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी केली आहे.
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांनी 'मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो', असे वक्तव्य केले आहे. त्याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. या मुद्यावरुन राज्यातील भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात विविध ठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पुण्यातही भाजपच्यावतीने नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत त्याना खुलं आव्हान देण्यात आले आहे.
पुण्यात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धिरज घाटे यांनी नाना पटोले यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी करत त्यांना खुलं आवाहन केलं आहे. नाना आपण पुण्यात कधी येतात ते सांगा आम्ही आपल्या स्वागताला उत्सुक आहोत. आम्ही स्वागत कसे करतो ते आपले सहकारी पक्षातील मित्र असणाऱ्या जीतूहीनला विचारा असे म्हणत धीरज घाटे यांनी नाना पटोले यांना खुलं आव्हान दिले आहे.
दरम्यान, नाना पटोलेंच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. भंडारा, नाशिक अमरावती, नाशिक, नागपूरमध्ये या ठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नागपूरमध्ये भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर 7 गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे. जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि एफआयर (FIR) ची प्रत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनमधून जाणार नसल्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
महत्त्वाच्या बातम्या: