एक्स्प्लोर
पुण्यातील औंधमध्ये बिम्सटेक देशांचा युद्ध सराव, सैनिकांच्या थरारक कसरती
यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय. नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत.
पुणे : बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.
तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.
शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.
नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं. थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.
काय आहे बिम्सटेक?
बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ ही दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 6 जून 1997 रोजी स्थापना करण्यात आलेल्या या संघटनेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
बंगालच्या उपसागरावर अवलंबून असलेल्या या सात देशांसाठी ‘बिम्सटेक’ हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं. दळणवळण, पर्यावरण, दहशतवाद रोखणं, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी मिळून काम करणं, ऊर्जा, आरोग्य, कृषी, व्यापार, तंत्रज्ञान, मासेमारी, हवामान बदल, संस्कृतीक समन्वय अशा घटकांवर बिम्सटेक संमेलनात प्रकाश टाकला जातो.
'बिम्सटेक'चं पहिलं संमेलन बँकॉकमध्ये (थायलंड) 31 जुलै 2004 रोजी झालं होतं. तर दुसरं संमेलन 13 नोव्हेंबर 2008 रोजी नवी दिल्लीत, तिसरं संमेलन 4 मार्च 2014 रोजी न्याय प्यायी डॉ (म्यानमार) आणि चौथं संमेलन नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नुकतंच पार पडलं. पाचव्या संमेलनाचं यजमानपद श्रीलंकेकडे देण्यात आलं आहे.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement