Chandrakant Patil : दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी, चंद्रकांत पाटलांचे पुणे जिल्हा प्रशासनाला निर्देश
पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Chandrakant Patil : इर्शाळवाडी दुर्घटनेच्या (landslide irshalgad) पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासन सतर्क झालं आहे. पावसाच्या (Rain) पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी. तसेच पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी दिले आहेत.
जिल्हा प्रशासनाला चंद्रकांत पाटलांच्या सूचना
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तयारीबाबत आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांची माहिती घेतली. तालुका पातळीवर प्रत्येक आठवड्यात दरड प्रवण गावांना भेटी देण्यात याव्यात. या गावांमध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात यावी. दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसाच्यावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होणार नाही यादृष्टीने आवश्यक प्रतिबंध घालण्यात यावे. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषत: दरड प्रवण क्षेत्रात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
डोंगर उतारावरील वाड्या, वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण
पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चंद्रकांत पाटील यांना दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात येवून दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांबाबत आढावा घेण्यात आला. तालुका स्तरावर पथके तयार करुन दरड प्रवण गावातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली. आपत्तीच्यावेळी नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी जवळची सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. दरड प्रवण गावांबाबत तालुका स्तरावरील नियंत्रण कक्षाद्वारे माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील डोंगर उतारावरील वाड्या, वस्त्या आणि गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्री पाटील यांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या: