Pratibha Pawar : प्रतिभाकाकींना गेटवर का अडवलं? बारामती टेक्स्टाईल पार्कची बाजू समोर
Baramati Textile Park : बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदीसाठी जात असताना प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना गेटवरच अडवण्यात आल्याची घटना घडली होती. त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
पुणे : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अर्धा तास अडवण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती. त्यावर आता बारामती टेक्स्टाईल पार्कच्या वतीनं स्पष्टीकरण देत या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. ज्या गेटवरून प्रतिभा पवार आतमध्ये येत होत्या ते गेट मालवाहतुकीसाठीचे होते. तसेच जो सुरक्षारक्षक त्या ठिकाणी होता तो परप्रांतिय होता. त्याने प्रतिभा पवार यांना ओळखलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदीसाठी जात असताना प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना गेटवरच अडवण्यात आल्याची घटना घडली होती. सुमारे अर्धा तास त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नव्हता. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा या सुनेत्रा पवार या आहेत. त्यामुळे घडलेल्या प्रकारावरून राजकीय टीका होऊ लागली. मात्र गैरसमजातून ही घटना घडल्याचं टेक्स्टाईल पार्ककडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय म्हटलंय बारामती टेक्स्टाईल पार्कच्या निवेदनात?
बारामती टेक्स्टाईल पार्कच्यावतीनं जे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे त्यामध्ये म्हटलंय की, ज्या सुरक्षारक्षकाने प्रतिभा पवारांना अडवलं तो परप्रांतीय होता त्यामुळे तो प्रतिभा पवार यांना ओळखू शकला नाही. ज्या गेटमधून प्रतिभा पवार आतमध्ये जाण्यासाठी आल्या होत्या त्या गेटमधून मालवाहतूक केली जाते. त्यामुळे तिथून त्यांना सोडण्यात आलं नव्हतं. परंतु ज्या वेळेस समजले की प्रतिभा काकी आल्या आहेत त्यावेळेस तात्काळ त्यांना आत मध्ये घेण्यात आलं. त्यानंतर त्यांचा महिलांसोबत कार्यक्रम देखील पार पाडला असं बारामती टेक्स्टाईल पार्कच्या वतीने सांगण्यात आले.
नेमकं काय घडलं होतं?
प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे या बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदीसाठी जात होत्या. त्यावेळी सुरक्षारक्षकाने त्यांना गेटवरच अडवलं. वरुन फोन आल्याने आत सोडू शकत नाही असं त्या सुरक्षारक्षकाने उत्तर दिलं. त्यावर आम्ही काही चोरी करण्यासाठी आलो नाही, खरेदी करण्यासाठी जात आहोत असं प्रतिभा पवार म्हणाल्या. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर प्रतिभा पवार यांना आत सोडण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर नाव न घेता टीका केली होती.
ही बातमी वाचा: