Baramati : आधी अजितदादा म्हणाले, काकी माझ्याविरोधात प्रचार करताहेत अन् आता प्रतिभा पवारांना बारामतीत गेटवर अडवलं; पवारांच्या कुटुंबात राजकारणाचा काटा रुतला?
Baramati Textile Park : बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये खरेदी करण्यासाठी गेलेल्या प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना गेटवरच अडवण्यात आलं. त्यावरून आता पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
मुंबई : लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही बारामतीत नात्यागोत्यांची लढाई जोरदार रंगल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच या आधी कुणी काय केलं या गोष्टीही समोर आणल्या जात आहेत. प्रतिभाकाकी या आधी कुणाच्या प्रचाराला गेल्या नाहीत, आता नातवाचा एवढा पुळका का आलाय असं त्यांना विचारणार असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी नुकतंच केलं होतं. आता त्या पुढचा अंक घडल्याचं दिसून येतंय. खरेदीसाठी गेलेल्या प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना सुनेत्रा पवार अध्यक्षा असलेल्या बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अडवण्यात आल्याची घटना घडली. सुमारे अर्धा तास त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं नाही. ज्या शरद पवारांनी बारामतीत टेक्स्टाईल पार्क आणला, त्यांच्याच पत्नीला आता गेटवर अडवण्यात आल्याची घटना घडली.
शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, मग बारामतीचा काय विषयच नाही. बारामतीमधील प्रत्येक पोरं न् पोर, वयोवृद्ध नागरिकही प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना ओळखतात. अशा वेळी बारामतीमध्ये असलेल्या टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच्या वॉचमनने त्यांना अडवलं. वरुन सीईओचा आदेश आल्याने आत सोडू शकत नाही असं त्याने उत्तर दिलं.
Pratibha Pawar Baramati Textile Park : वरुन फोन आलाय, आत सोडू नका
समोर शरद पवारांच्या पत्नी असतानाही वॉचमनने त्यांना आत न सोडणे हे अतिधाडसाचं काम. पण वरुन आदेशच तसा आला असेल तर मग तो तरी काय करणार? प्रतिभा पवारांना अडवणारा वॉचमन हा हिंदी भाषिक आहे. प्रतिभा पवारांसोबत इतर दोन व्यक्तीही होत्या. ते दोघेही सातत्याने वॉचमनला आत सोडण्यासाठी समजावत होते. गाडीत कोण आहेत हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण वॉचमन एकच सांगत होता, वरुन फोन आलाय, आत सोडू नका.
आम्ही काय चोरी करायला आलोय का?
आम्हाला पाहून गेट बंद केलं का? आम्ही काय चोरीला आलोय का? असे प्रश्न प्रतिभा पवार यांनी यावेळी विचारले. आम्हाला फक्त खरेदी करायची आहे असंही त्यांनी सौम्य भाषेत सांगितल्याचं दिसून येतंय.
अनिल वाघ नावाच्या सीईओने प्रतिभा पवारांना गेटवर अडवण्याचा आदेश दिल्याचं समोर आलं. त्यावर प्रतिभा पवार म्हणाल्या की, तुम्हाला जसा फोन आला तसा त्यांना पुन्हा एकदा फोन करून विचारा. त्यांना फक्त खरेदी करायची आहे, आत सोडू का असं विचारा असं प्रतिभा पवारांनी त्या वॉचमनला सांगितलं. त्यानंतरही त्या वॉचमनने प्रतिभा पवारांना आतमध्ये सोडलं नाही. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांच्यासाठी गेट खोलण्यात आल्याची माहिती आहे.
Ajit Pawar On Pratibha Pawar : नातवाचा एवढा पुळका आलाय का?
बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले होते की, "प्रतिभाकाकी एवढी वर्षे कधीही कुणाच्या प्रचाराला आल्या नव्हत्या. आता नातवाच्या प्रचारासाठी फिरतात. तुम्हाला नातवाचा एवढा पुळका आलाय का असं मी त्यांना भेटून विचारणार आहे."
पहिला राष्ट्रवादी फुटली, पवारांनी स्थापन केलेला पक्ष अजितदादांना मिळाला. त्यानंतर लोकसभेच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजितदादांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उभं केलं. त्यात बारामतीकरांचा कौल शरद पवारांच्या बाजूने गेला आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता विधानसभेच्या निमित्ताने अजितदादांसाठी हा सर्वाधिक आव्हानाचा काळ आहे. कारण विधानसभेला पुतण्यानेच त्यांच्याविरोधात दंड थोपाटले आहेत आणि शरद पवारांची सर्व ताकद युगेंद्र पवारांच्या मागे आहे. सुरूवातीला फक्त निवडणुकीचं राजकारण वाटणारं बारामतीमधील हे चित्र आता बदलतंय का? शरद पवार आणि अजित पवार यांचे वाद आता त्यांच्या कुटुंबात खोलवर रुतलेत का? बारामती टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर प्रतिभा पवारांना अडवल्यानंतर असे अनेक प्रश्न पडतात.
ही बातमी वाचा: