Baramati Crime news : मुलीनं प्रेमविवाह केल्याने आई अन् भावाचा राग अनावर; मुलीच्या दीरावर केला जीवघेणा हल्ला, बारामतीतील घटना
मुलीने प्रेमविवाह केल्यावर संतापलेल्या आईने आणि भावाने मुलीच्या दीरावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील माळेगावात ही घटना घडली आहे.
Baramati Crime news : मुलीने प्रेमविवाह (Crime News) केल्यावर संतापलेल्या आईने आणि भावाने मुलीच्या दीरावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर येथे ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही घरच्यांचा लग्नासाठी विरोध असल्याने दोघेही घरातून निघून गेले होते, याचा मुलीच्या कुटुंबियांना राग आला आणि त्यांनी मुलीच्या दीरावर हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने दोघे घरातून पळून गेले. त्यानंतर मुलीच्या आईने आणि भावाने मुलाच्या घरात जाऊन त्याच्या भावाला धमकी दिली. तत्काळ दोघांना बोलवून घेण्यास सांगितले. सुनिता संजय चव्हाण आणि मयूर संजय चव्हाण असं मुलीच्या आईचं आणि भावाचं नाव आहे. दोघांनी मिळून मुलाच्या घरी जाऊन दमदाटी केली. मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली मात्र त्यांंच्या नातेवाईकांना मुलगा कुठे आहे? याबाबत माहिती नसल्याचं सांगितलं. हे ऐकताच मुलीच्या भावाने तिच्या दीराच्या डोक्यात दगड मारला. दगड जोरात लागल्याने दीर बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी देखील मारहाण केली. यात दीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुलीच्या आई आणि भावाला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची आई सुनिता संजय चव्हाण आणि भाऊ मयूर संजय चव्हाण यांनी दोघांनी मिळून हा हल्ला केला आहे. मुलगी पळून गेल्याचा राग त्यांनी मुलीच्या दीरावर काढला आणि त्याला गंभीर दुखापत केली. या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोघांनाही संरक्षण देण्यात आलं आहे
हा प्रकार घडल्यानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी आम्ही सज्ञान असून प्रेमविवाह केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. येत्या काळात त्यांच्याही जीवाला धोका असल्याने दोघांना संरक्षण देण्यात आलं आहे. दोघांचा विवाह झाला आहे मात्र कुटुंबियांना मान्य नसल्याने दोन कुटुंबियांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
ही बातमी देखील वाचा