Pune News: पुण्यातील राष्ट्रवादीच्या आमदार बंधुसह विरोधी गटाच्या संस्थापकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; दोघांची चौकशी होणार
पुण्यातील मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंच्या भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर शेळके असं त्यांचं नाव आहे. राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुधाकर शेळकेंनी केला आहे.
Pune News : पुण्यातील मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सुधाकर शेळके असं त्यांचं नाव आहे. राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप सुधाकर शेळके यांनी केला आहे. दुसरीकडे त्यांनी ज्यांच्यावर आरोप केला आहे ते जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंवर ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मी ज्यावेळी गुन्हा केला असा आरोप माझ्यावर करण्यात आला त्यावेळी मी पोलीस उपायुक्त यांच्यासमोर बसलो होतो. मला जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आवारेंनी केला आहे.
वादाला विधानभवनाची किनार
या वादाला विधानभवनाची किनार आहे. आमदार सुनील शेळके विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसले होते. त्यावेळी किशोर आवारेंनी एक आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून आमदार शेळकेंचे बंधू सुधाकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. "खोके आणि टक्केवारी"च्या हवाल्याने वादाला तोंड फुटलं. फोनवरुन एकमेकांना शिवीगाळ अन् धमकी दिली गेली. प्रकरण तळेगाव पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं. दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलावून शांतता भंग न करण्याचा सूचना देण्यात आल्या. मात्र त्याच पोलीस स्टेशन बाहेर दोघांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक युद्ध घडलं होतं. यातून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र फिर्यादी देण्यात आल्या. दोघांच्या कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ आणि धमकवल्याचे आरोप केले. त्याप्रकरणी आमदार सुनील शेळकेंचे भाऊ सुधाकर शेळकेसह तिघांवर आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारेंसह तिघांवर अॅट्रॉसिटीसह धमकवल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले.
दोन्ही गुन्ह्यांची चौकशी होणार
या प्रकरणाची आता वरिष्ठ पातळीवर दोन्ही गुन्ह्यांची चौकशी केली जाणार आहे. "मी पोलीस स्टेशनमधून घरी येईपर्यंत माझ्यासोबत पोलीस होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली आहे. पोलिसांना याबाबत सर्व कल्पना आहे. केवळ राजकीय आकसापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचं म्हणत पोलीस तपासात माझा यात काही संबंध नसल्याचं स्पष्ट होईल," असा दावा सुधाकर शेळकेंनी केला आहे.
"मी गुन्हा केल्याचा आरोप ज्यावेळी माझ्यावर करण्यात आला होता. त्यावेळी मी वीस किलोमीटर लांब असलेल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये होतो. पोलीस उपायुक्तांनी मला तिथे बोलावलं होतं. मग माझा या गुन्ह्याशी कसा काय संबंध जोडला गेला? विनाकारण मला यात गोवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईल," असा दावा किशोर आवारेंनीही केला आहे. या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.