Pune News: गाईच्या शेणाच्या गणेशमुर्ती म्हणजे देवाचा अपमान म्हणणाऱ्यांना असीम सरोदेंनी चांगलंच खडसावलं, म्हणाले...
गाईचेच शेण आणि मूत्र नाही तर इतर कोणत्याही पाळीव प्राण्यांचे शेण आणि मूत्र वापरून आकारास येणारी कोणत्याही देवाची मूर्ती देव या संकल्पनेचा अपमान ठरत नाही, असं वक्तव्य अॅड. असीम सरोदे यांनी केलं आहे.
Pune News: गाईचेच शेण आणि मूत्र नाही तर इतर कोणत्याही पाळीव प्राण्यांचे शेण आणि मूत्र वापरून आकारास येणारी कोणत्याही देवाची मूर्ती देव या संकल्पनेचा अपमान ठरत नाही, असं वक्तव्य अॅड. असीम सरोदे यांनी केलं आहे. शेणाची गणपतीच्या मुर्तीला सध्या सगळीकडे चांगली मागणी आहे. मात्र शेणापासून गणपती बनवणं हा देवाचा अपमान आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असले प्रकार करतात, असा एका व्यक्तीने आक्षेप नोंदवला होता. न्यायालयात याचिकादेखील दाखल करायची होती मात्र त्यासाठी सरोदे यांनी साफ नकार दिल्याचं त्यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
शेण व गोमूत्राच्या वापरातून गणपतीच्या मूर्ती करतायेत. हा देवाचा अपमान आहे? कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे असले प्रकार करतात. आम्हाला या बद्दल कोर्टात केस करायची आहे. काल मला फोनवरून एक व्यक्ती रागारागात सांगत होती. मी त्यांना सांगितले की शेणाच्या व गोमूत्राच्या गणपती मूर्ती करणाऱ्यांच्या उद्देश देवाचा अपमान करणे, अप्रतिष्ठा करणे व हिंदू धर्माला तुच्छ लेखण्याचा आहे असे मला वाटत नाही. शेणाच्या आणि मूत्राच्या देवाच्या मूर्ती करणे हाच चुकीचा, अपमानास्पद प्रकार आहे आणि त्यात दुसरा काय उद्देश असणार? तुम्ही घ्या केस आम्ही खर्च करायला तयार आहोत, अशी मागणी केल्याचं त्यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
मी त्यांना नम्रपणे सांगितले की मला मुळात हा विषय पटला नाही त्यामुळे तुमचे पैसेही नकोत व केस सुद्धा नको. मला जो विषय योग्य वाटतो, ज्यात संविधानाचा दृष्टिकोन व लोकशाहीचा नवीन अर्थ मांडता येत असेल त्या केसेस मध्ये मी मनापासून सहभागी होऊ शकतो. त्यांनी फोन कट केला. आज गोशाळेत शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणपती मूर्तींची बातमी प्रसिद्ध झाली ती जरूर वाचावी. देव आहे असे वाटणाऱ्या सगळ्यांनी लक्षात घ्यावे की देव आपल्या डोक्यात असतो. आपल्यातील विकृत, अपरिपक्व, विद्वेषी विचार देवाच्या नावावर जमा करून देवाचाच राक्षस करण्याचा कुणाला अधिकार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
माणसांना पुढे नेणारा विचार देव आहे व मागासलेला विचार म्हणजे राक्षस आहे. तुम्ही देवाची आराधना करता की राक्षसाची यावरून माणूस म्हणून तुमचा दर्जा ठरणार आहे. देव ही मनाची एक चांगली स्थिती असेल तर भावनांना सकारात्मक व माणुसकीप्रधान आकार देणे माणसाला जमले पाहिजे. गाईचेच शेण व मूत्र नाही तर इतर कोणत्याही पाळीव प्राण्यांचे शेण आणि मूत्र वापरून आकारास येणारी कोणत्याही देवाची मूर्ती देव या संकल्पनेचा अपमान ठरत नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे.