(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baramati : विजय शिवतारेंचा बारामतीत धडाका! भोरच्या थोपटेंनंतर आता अजित पवार विरोधक 'या' मोठ्या नेत्याची भेट घेणार
Baramati Lok Sabha Election : विजय शिवतारे यांनी आता पवार विरोधी असलेल्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. साडे पाच लाख मतदान विरोधात असल्याचं सांगत ते आपल्यालाच पडणार असा दावा त्यांनी केलाय.
पुणे: अजित पवारांविरोधात दंड थोपटलेल्या विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) कोणत्याही परिस्थितीत आता बारामती लोकसभा लढायचीच असा निश्चय केल्याचं दिसतंय. त्याचमुळे त्यांनी आता बेरजेचं राजकारण करत अजित पवारांच्या विरोधकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भोरचे अनंतराव थोपटे यांच्यानंतर आता इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची (Harshavardhan Patil) भेट घेणार असल्याची माहिती विजय शिवतारेंनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच विजय शिवतारे यांनी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. अनंतराव थोपटे हे शरद पवारांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी 40 वर्षांचे राजकीय वैर बाजूला ठेऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बारामतीतून दंड थोपटलेल्या विजय शिवतारेंनीही अनंतराव थोपटे यांची भेट घेत त्यांचा पाठिंबा मागितला होता.
हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार
बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभेचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची भेट घेणार असल्याचं विजय शिवतारे यांनी जाहीर केलं. हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे विरोधक म्हणून ओळखलं जातं. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून त्या ठिकाणी त्यांचे विश्वासू असलेल्या दत्तात्रय भरणे यांना निवडून आणलं होतं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांवर नाराज आहेत.
हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही त्यांची खदखद बोलून दाखवली होती. अजित पवारांनी आतापर्यंत तीन वेळा आमच्या पाठित खंजिर खुपसला, आता जर त्यांनी विधानसभेला आमचं काम केलं तरच आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू असा इशाराच त्यांनी दिला होता.
आता हर्षवर्धन पाटलांच्या नाराजीचा फायदा विजय शिवतारे घेण्याच्या तयारीत असून ते त्यांच्या भेटीला जाणार आहेत.
अजित पवारांनी बारामतीचा बिहार केला
अजित पवारांवर टीका करत विजय शिवतारे म्हणाले की, "मी उमेदवारी जाहीर केल्यानंतर लोक खुश आहेत. अनेक वर्षे ती दाबून राहिली आहेत. बिहारमध्ये जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. अजित पवारांनी या ठिकाणी नेक्सस तयार केलं आहे, गुंडांकडून दम दिला जातोय. त्यामुळे दोन्ही पवार आता नको असं लोकांचं मत आहे. माझा विरोध हा वैयक्तिक नसून पवार या प्रवृत्तीला आहे."
महायुतीडून तिकीट मागितले
आपण महायुतीकडून तिकीट मागितलं असून ही जागा सहज जिंकू असं महायुतीच्या नेत्यांना सांगितलं असल्याचं विजय शिवतारे म्हणाले. अमित शहा यांनीही इलेक्टिव्ह मेरिट बघा असं सांगितले आहे. आता वरिष्ठांनी ठरवायचं आहे असं शिवतारे म्हणाले.
राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, सुनील तटकरे बावळटगिरी बोलत आहेत, ही अॅव्हरेज माणसे आहेत. मी कुणाचीतरी स्क्रिप्ट वाचतोय असा संभ्रम राष्ट्रवादीकडून केला जात आहे. मी जलसंपदा मंत्री होतो एवढंच लक्षात ठेवा. मी स्वयंभू आहे.
ही बातमी वाचा: