Pune porsche car Accident : 1758 रुपयांसाठी रखडली होती 'त्या' आलिशान पोर्शे गाडीची नोंदणी!
कल्याणीनगर येथील कार अपघातातील कोट्यवधी रुपये किमतीची आलिशान पॉर्शे गाडीची परिवहन कार्यालयातील नोंदणी ही केवळ 1758 रुपयांसाठी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे : कल्याणीनगर येथील कार अपघातातील कोट्यवधी रुपये किमतीची आलिशान पॉर्शे गाडीची परिवहन कार्यालयातील नोंदणी ही केवळ 1758 रुपयांसाठी रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडी 18 एप्रिल रोजी पुण्यातील परिवहन कार्यालयात आली असताना त्याची पाहणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतरही गाडीच्या मालकाकडून नोंदणीप्रक्रिया का पूर्ण करण्यात आली नाही, याबाबत अनभिज्ञ असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कल्याणीनगर येथे रविवारी ( दि. 19) रोजी पहाटे, भरधाव वेगाने जात असलेल्या या आलिशान पॉर्शे गाडीने धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या वेळी या गाडीला नंबर प्लेट नव्हती, त्यामुळे या गाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच परिवहन विभागाकडून गाडीच्या नोंदणी बाबत नव्याने माहिती समोर आली आहे.
परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गाडीची किंमत ही सुमारे 2.25 कोटी रुपये इतकी होती. यावर साधारणपणे ऑनरोड किंमतीवर तब्बल 50 लाख रुपये इतका कर आकारण्यात आला असता. मात्र संबधित गाडी ही इलेक्ट्रिक व्हेईकल होती. नियमानुसार कोणतीही हाय एंड टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ही इलेक्ट्रिक व्हेईकल प्रकारातील असेल, तर त्यासाठी मोटार व्हेईकल टॅक्स किंवा रस्ता कर आणि नोंदणी शुल्क आकारले जात नाही. सामान्य गाड्यांवर त्यांच्या ऑन रोड किंमतीच्या 20 टक्के इतका कर आकारला जातो."
संबधित गाडी ही 18 एप्रिल रोजी परिवहन कार्यालयात तपासणीसाठी आणण्यात आली होती. यावेळी गाडी मालकाने त्यांच्या आवडीच्या नंबरची ( MH 12 WQ 2000) निवड देखील केली होती. मात्र स्मार्ट कार्ड, हायपोथेकेशन आणि पोस्टल शुल्क असे 1758 रुपये भरण्यात आले नव्हते, त्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. गाडी मालकाने हे पैसे का नाही भरले याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे भोर यांनी सांगितले.
अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी-
अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
