(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune News : 24 तास उलटले तरी बिबट्या सापडेना; कात्रजमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, प्राणीसंग्रहालय आजही बंद
पुण्यातील कात्रज भागातीलराजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या पिंजऱ्यातून एक बिबट्या पळून 24 तास उलटले आहेत. मात्र अजूनही बिबट्या संग्रहालयाच्या आवारातच असून पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत
पुणे : पुण्यातील कात्रज भागातील ( Pune News) राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) पिंजऱ्यातुन एक बिबट्या (Leopard) पळून 24 तास उलटले आहेत. मात्र अजूनही बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असून त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत. हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आला मात्र मजबूत पिंजऱ्यातुन बिबट्या बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे.
मागील 24 तासांपासून या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. अग्निशमनदलासोबतच विविध रेक्यू टीम्स दाखल झाल्या आहेत. बिबटा जग वाकवून बाहेर पडल्याचं समोर आल्यानंतर त्याचा शोध सुरुच आहे. हा बिबट्या जर कात्रजच्या वस्तीत शिरला तर नागरिकांना मोठा धोका आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
कात्रज परिसरात भीतीचं वातावरण
राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज परिसरात आहे. हा बिबट्या पळाल्याने या परिसरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांकडून बिबटा कुठे गेला?, असे प्रश्न विचारले जात आहे. शिवाय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दीदेखील केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. साधारण बिबटा नेमका कोणत्या परिसरात आहे, याचा शोध लागत नाही आहे. त्यामुळे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं असलं तरीही सर्व रेस्क्यू टीमकडून प्रयत्न केले जात आहे.
प्रशासनाचा गलथान कारभार!
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र सोमवारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की पिंजऱ्यामध्ये बिबट्या नाही. पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो पसार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं. पसार झालेल्या बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र तो सापडला नसल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे.
इतर महत्वाची बातमी-