Ajit Pawar : मोठी बातमी! पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट
अजित पवारांनी नेहमीची गाडी न वापरता दुसरीच गाडी वापरली, त्यामध्ये कॅमेरामध्ये दिसू नये यासाठी अजित पवार त्या गाडीमध्ये मागे झोपल्याचं दिसून आलं.
पुणे: राज्याच्या राजकारणात सध्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार उपस्थित असताना अजित पवारही या बंगल्यावर जातानाचं दृष्य एबीपी माझाच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. काका-पुतण्याच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आल्याचं दिसून आलं आहे.
पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्कमधील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार यांनी याच वेळी शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर येत आहे. यावळी अजित पवार यांनी त्यांची सिक्युरिटी घेतली नव्हती, ती सर्किट हाऊसकडे रवाना झाली.
नेमकं काय घडलं?
कोरेगाव पार्कमधून अजित पवारांची नेहमीची गाडी बाहेर पडली पण ती रिकामी होती. चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार हे दुसऱ्याच एका गाडीमध्ये बसल्याचं दिसून आलं. माध्यमांच्या कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी अजित पवार हे गाडीत पूर्णपणे झोपल्याचं स्पष्ट दिसतंय. पण ही गाडी चोरडिया यांच्या बंगल्याच्या गेटला धडकली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दुपारी उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर होते. त्या ठिकाणी त्यांनी जेवणही केलं. शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटीलही त्या ठिकाणी उपस्थित होते अशी चर्चा आहे. त्याचवेळी चांदणी चौकातील कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे सर्किट हाऊसवर न जाता दुसऱ्याच गाडीने चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये यावेळी दीर्घ चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे.
संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास शरद पवार हे चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडले. त्याच्यानंतर सव्वा सहा ते साडे सहाच्या सुमारास जयंत पाटील हे त्या ठिकाणाहून बाहेर पडल्याचं समोर आलं. त्यानंतर 6.40 मिनिटांनी अजित पवार हे या ठिकाणाहून बाहेर पडले. अजित पवार बाहेर पडताना पुढच्या सीटवर होते आणि माध्यमांच्या कॅमेरात न येण्यासाठी ते गाडीतून पूर्णपणे झोपून गेल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.
यावर बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अमोल मिटकरी म्हणाले की, याबाबत काहीही माहिती नाही. जर अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली असेल तर ती भेट पारिवारिक भेट असेल.
ही बातमी वाचा: