Pune News : पैज लावणं जीवावर बेतलं, पुण्यातील इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
Pimpri Chichwad : पैजेच्या नादात पुण्यातील इंद्रायणी नदीत एका तरूणाने जीव गमावला आहे.
पिंपरी-चिंचवड : इंद्रायणी नदीत पोहण्याची पैज एका तरुणाला चांगलेच महागात पडले. नदी ओलांडताना त्याचा बुडून मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडलगतच्या मावळ तालुक्यात घडली. संतोष जाधव (वय 25) असं मृत तरुणाचे नाव होते. तब्बल चोवीस तासानंतर त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आलं.
मूळ लातूरचा असलेला संतोष पुण्याच्या खेड तालुक्यात नोकरीसाठी होता. मित्रांसमवेत रविवारच्या सकाळी तो मावळ तालुक्यात आला होता. वराळे गावातील इंद्रायणी नदीच्या काठी ते पोहचले. संतोष मित्राच्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला आला होता. वाढदिवसाचे सेलिब्रेशन जोमात सुरू होतं. सगळे एका ठिकाणी बसले होते, तेव्हा संतोष आणि एका मित्रात पोहण्याची पैज लागली. पैज होती एका दमात इंद्रायणी नदीच्या पलीकडच्या तिराला स्पर्श करून परतायचं होतं. चेष्टे-चेष्टेत लागलेली पैजेला दोघेही तयार झाले.
सायंकाळी चारच्या सुमारास दोघांनी नदीत उडी घेतली. मित्राने आघाडी घेतली होती, हे पाहून संतोषने जोर लावला पण तो पोहताना मध्येच दमला. पण पैज जिंकण्याचा हा अट्टाहास पुढे त्याच्या जीवावर बेतेल याची थोडी देखील कल्पनाही नव्हती. कारण दम लागल्याने तो अचानक बुडाला. पण मित्र पलीकडच्या तीरावर पोहचला, त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा संतोष दिसेनासा झाला. त्यांच्या सोबतच आलेल्या एका लहान मुलाने संतोषला बुडताना पाहिलं होतं. त्याने सर्वांना याबाबत सांगितलं. सर्व मित्रांनी मिळून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतोष काही सापडला नाही.
त्याचवेळी वन्यजीव मावळ आणि शिवदुर्ग बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं. पण रात्री उशिरापर्यंत शोध लागलाच नाही. शेवटी बचावकार्य थांबवून सोमवारी सकाळी शोधकार्य सुरू केलं. अथक प्रयत्नानंतर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह मिळाला.
संबंधित बातम्या :