Paper Leak : आरोग्य भरती पेपर घोटाळ्यातील म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या
Paper Leak : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणातील म्होरक्याला पुणे पोलिसांनी अटक केली.
Paper Leak : राज्यभर गाजत असलेल्या आरोग्य भरती पेपर फुटीतील पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला आणखी एक म्होरक्या सायबर पोलीसांच्या हाती लागला आहे. अतुल प्रभाकर राख असे आज अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अतुल राख हा याआधीच अटकेत असलेला आरोपी संजय सानप याचा मेहुणा आहे.
पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याची पेपरफुटी प्रकरणातील संबंधित सर्व कामे अतुल राख करायचा. अतुल राखला पोलिसांनी पुण्यातूनच अटक केली. आरोग्य भरतीतील गट ‘क’ आणि गट ‘ड’ या दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या पेपरफुटीमुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली होती. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत काही आरोपींना अटक केली असून काहींचा शोध सुरू आहे. आरोग्य भरतीच्या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलीसांना वडझरीचे सानप बंधू हवे आहेत. या प्रकरणात केवळ संजय शाहुराव सानप याला पोलिसांनी गजाआड केले आहे.
पेपरफुटी प्रकरणातील म्होरक्या अतुल राखे याला अटक झाल्याने इतर आरोपींचे धाबे दणाणले आहे. पोलीस चौकशीत अतुल राखकडून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस आज अतुल राख याला कोर्टात हजर करणार आहे.
अधिकाऱ्यांनाही अटक
राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले यांना अटक करण्यात आली होती. आरोग्य विभाग भरतीचा पेपर सेट करण्यात डॉ. महेश बोटले सहभागी होते. त्यांनीच हा पेपर फोडल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोग्य विभागातील भरती प्रकरणात आतापर्यंत बारापेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
२४ ऑक्टोबर 2021 रोजी झालेला आरोग्य विभागाचा गट क चा पेपरही फुटला होता. यामध्ये न्यासा कंपनीचे अधिकारी सहभागी होते अशी माहिती पोलीस तपासात समोर आली होती. गट 'ड' चा पेपर न्यासाचे अधिकारी आणि बोटले आणि बडगिरे अशा दोन व्यक्तींच्या माध्यमातून फुटला होता. दोघे एकमेकांशी संबंधित होते का याचा तपास सुरू आहे. गट 'क' चा पेपर फोडण्यात न्यासाच्या अधिकाऱ्यांसोबत सहभागी असलेल्या दोन दलालांना याआधीच अटक करण्यात आली आहे.