Maharashra Drought : दुष्काळाची टांगती तलवार; राज्यातील 13 जिल्हे रेड झोनमध्ये, मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश
Marathwada : मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा रेड झोनमध्ये समावेश असून, या जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. 13 जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे: यंदा पाऊस उशिरा दाखल झाला. त्यातच राज्यात यंदा अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट असून, काही जिल्हे तर थेट रेड झोनमध्ये असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली असून, राज्यात जोरदार पावसाची गरज आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
कोणत्या जिल्ह्यामध्ये भीषण परिस्थिती?
राज्यात पावसाने दडी मारल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्ह्यात पिण्यासाठी पाणी, जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सर्वत्र चांगला झाला नाही. कोकण आणि गोव्याचा काही भाग, तसेच ठाणे आणि नांदेड जिल्हा सोडल्यास इतर ठिकाणी पाऊस सरासरी इतका आहे. तसेच राज्यातील 13 जिल्ह्यात तर सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे. ज्यात अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती या जिल्ह्यात सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस झाला असून, त्यांच्यावर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे हे तेराही जिल्हे रेड झोनमध्ये असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता कमीच
जून ते सप्टेंबर असा पावसाचा कालखंड आहे. तर ऑगस्ट आणि जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस होत असतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असते. मागील काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास सप्टेंबर महिन्यात पाऊस कमीच असतो. दरम्यान, आजपासून पुढील पाच ते सात दिवसांचा अंदाज पाहिल्यास या काळात खूप असा पाऊस होईल याची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मोठा पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
मराठवाड्यातील 6 जिल्हे रेड झोनमध्ये
यंदा राज्यात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाले असून, ज्यात 36 पैकी 13 जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात मराठवाड्यातील आठपैकी 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड आणि लातूर जिल्हा सोडल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव,परभणी, हिंगोली या 6 जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. त्यामुळे त्यांचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असून, या दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
