(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anna Bansode On Maharashtra Politics : अजित पवारांचं सत्तेत सहभागी होण्याचं हे आहे खरं कारण ...'; दादाच्या सहकाऱ्याने सांगितलं बंडाच 'राजकारण'
अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं आमचं ध्येय आह, म्हणूनच आम्ही या सत्तेत सहभागी झालो आहोत, असा गौप्यस्फोट पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
Anna Bansode On Maharashtra Politics : अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचं (Anna Bansode) आमचं ध्येय आहे, म्हणूनच आम्ही या सत्तेत सहभागी झालो आहोत, असा गौप्यस्फोट पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. अजित पवारांच्या 2019च्या भल्या सकाळी झालेल्या आणि गेल्या आठवड्यात झालेल्या शपथविधीचे बनसोडे हे साक्षीदार आहेत. या दोन्ही शपथविधीवेळी मी त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे उभा होतो, त्यामुळं मला ते मंत्रीपद नक्की देतील, असा विश्वास बनसोडे यांना आहे.
अजित पवारांच्या बंडाची कल्पना शरद पवारांना नसेल. त्यांच्या सल्ल्याने हे बंड झालं नाही आहे. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे या सर्वांना सोबत घेत अजित पवारांनी शपथविधी घेतला होता. याची पूर्व कल्पना शरद पवारांना नसावी, असं ते म्हणाले.
बंडाची कल्पना शरद पवारांना नव्हती!
आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, या सगळ्या बंडाची कल्पना आमच्यातील नेत्यांनाही नव्हती. मुंबई गाठल्यावर अजित पवारांनी या बंडासंदर्भात आम्हाला सांगितलं होतं. या शपथविधीच्या पूर्वी सुप्रिया सुळेंनी आमदारांशी चर्चा केली नाही. त्यावेळी हे बंड होणार असल्याचं त्यांनाही माहिती नसावं, असंदेखील ते म्हणाले. पहाटेच्या शपथविधीच्यावेळी जे घडलं ते शरद पवारांच्या सल्ल्याने असू शकतं मात्र यावेळी तसं काहीही नाही. यावेळी शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांनी काही आमदारांना फोन केले होते, असा दावादेखील त्यांनी केला आहे.
मंत्रीपद मिळाल्याचं अजिबात दु:ख नाही...
यंदाच्या शपथविधीत काही नेत्यांना मंत्रीपदं मिळाली. मात्र मागच्यावेळी आणि यावेळीदेखील मला मंत्रीपद मिळालं नाही. मात्र मला मंत्रीपद मिळाल्याचं अजिबात दु:ख नाही. मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री कऱण्याची राज्यातील जनतेची इच्छा होती. त्यामुळेच अनेक लोक अजित पवारांच्या गटात सामील झाले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
... म्हणून आम्ही अजित पवारांसोबत!
अजित पवार हे कायम विकासावर भर देतात. दीड वर्षात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एवढ्या वर्षात रखडलेली कामं पूर्ण केली तर महाराष्ट्रातील जनता नक्कीत अजित पवारांवर विश्वास ठेवतील. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार येतील आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे प्रत्येक नेते आणि आमदार आपल्या भागात रखडलेल्या कामांवर लक्ष देत आहेत. ती सगळी कामं पूर्ण झाली पाहिजे आणि प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे या हेतूने आम्ही सगळे अजित पवारांच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा-