Ajit Pawar: 'बरोबर नाही हे...', मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अजित पवारांनी मंदिरातील सदस्यांना झापलं, काय आहे कारण?
Ajit Pawar: अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी शेजारीच असलेल्या मंदिराच्या परिसरातील अस्वच्छतेवरून मंदिरातील सदस्यांना झापलं आहे.
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी अजित पवार यांनी रविवार पेठेतील एका सोन्याच्या दालनाचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यावर शेजारीच असलेल्या माहेश्वरी मंदिरामध्ये अजित पवारांनी (Ajit Pawar) दर्शन घेतलं. यावेळी मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ असलेला कचरा आणि अस्वच्छता पाहून अजित पवारांनी (Ajit Pawar) मंदिर समितीच्या सदस्यांना सुनावलं आहे.
त्याचबरोबर मंदिरात बांधलेल्या तारा आणि बाकी गोष्टीवरून देखील अजित पवार (Ajit Pawar) बोलले. इतकं सुंदर मंदिर आहे, हे काय लावलंय, बाहेर आल्यावर घाण दिसली. इतकं मोठं मंदिर आहे, इतकी माणसं येतात, मंदिर स्वच्छ ठेवायचं. महानगरपालिका झाडेल तेव्हा झाडेल. मंदिरात येताना अशी घाण दिसते बरोबर नाही हे, असं देखील पवार यावेळी म्हणालेत. मंदिरात बांधलेली तार पाहून ही कसली तार आहे बांधली आहे, तिकडे वायरी लोंबत आहेत, मी बोललं की तुम्हाला दिसतं मग स्वच्छता ठेवा, व्यवस्थित करून घ्या ना सगळं असं म्हणत अजित पवारांनी मंदिरातील सदस्यांना सांगितलं आहे.
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अजित पवारांनी मंदिरातील सदस्यांना झापलं#ajitpawar #pune #Punenews pic.twitter.com/voH0SHsGMk
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 16, 2024
राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात तातडीच्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. कुठेही बाईट देणार नाही. बैठक झाली की नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे असं नाही. आम्हाला जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतात तेवढ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही सांगत असतो ते आमचं कर्तव्य आहे. सगळ्या गोष्टी प्रेसला सांगून ती माहिती सगळीकडे देण्याचं काही कारण नाही. काही गोष्टी अशा असतात की, त्या आमच्या अंतर्गत चर्चा असतात असंही अजित पवार म्हणालेत. तर कर्जत बारामती विधानसभा निवडणुकीवर विचारल्यावर तुम्ही काही पण चर्चा कराल त्या प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाही असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
पुण्यात तातडीची बैठक, अजित पवार ते प्रफुल पटेल, भुजबळ तटकरेंसह नवाब मलिकांची हजेरी
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे. या बैठकीला प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, शिवाजीराव गर्जे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे बडे नेते पुण्यात आहेत. अजित पवार यांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी बैठक झाली असल्याची माहिती आहे. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल पटेल, नवाब मलिक, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव गर्जे आणि इतर नेते उपस्थित होते.
या बैठकीत राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचे 12 आमदार त्यामध्ये कोणती नावं द्यायची याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय विधानसभेचं जागावाटप यावर महत्वाची चर्चा सुरु आहे. महायुतीत किती जागांवर दावा करायचा यावरही निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.