Ajit Pawar: 'कोणी फारसं ओळखत नव्हतं तेव्हा भूशी धरणासह विविध पॉइंटवर जायचो अन्....', अजित पवारांनी सांगितली जुनी आठवण
Ajit Pawar: अजित पवार यांनी आज लोणावळ्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांना जेव्हा जास्त लोक ओळखत नव्हते तेव्हा ते लोणावळ्यात जायचे.
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज लोणावळ्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यांना जेव्हा जास्त लोक ओळखत नव्हते तेव्हा ते लोणावळ्यात जायचे. त्याठिकाणी असणाऱ्या भूशी धरणावर जायचे. त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील ते जायचे. पण, जेव्हा लोक त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळखायला लागले तेव्हापासून जाण्यात खंड पडल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
मला जेव्हा फारसं ओळखलं जातं नव्हतं. तेव्हा मी लोणावळ्यामार्गे...
बऱ्याच वर्षांपूर्वी खोपोलीत रमाकांतचा वडापाव तर खंड्याळात दाजींची भजी खाल्ल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवास व्हायचा नाही. मात्र काळानुरूप बदल झाले, द्रुतगती मार्ग उभारला गेला आणि या फेमस व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळं व्यवसाय करताना ठिकाण योग्य निवडा. मला जेव्हा फारसं ओळखलं जातं नव्हतं. तेव्हा मी लोणावळ्यामार्गे आलो की भुशी धरणासह विविध पॉइंटवर यायचो, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचो. मात्र आता मला लोक ओळखायला लागले आणि यामध्ये खंड पडला असंही अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे.
पर्यटकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा...
या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोणावळ्यात पर्यटकांची संख्या मोठी असते. पण इथं येणाऱ्या पर्यटकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. सलगच्या सुट्ट्या लागून आल्या की लोणावळ्यात वाहतूक कोंडी सुद्धा होत असते, आत्ता ही मी चौकाजवळ येण्यापूर्वी वाहतूक कोंडी जाणवली. लता मंगेशकर एकेकाळी आठ तास पुणे-मुंबई प्रवासात अडकल्या होत्या. हा त्रास अनेकांना होतो, त्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पर्याय शोधत असतो. आता मिसिंक लिंक तयार होतोय, बोरघाट पूर्वी या मार्गाला लागलं की थेट लोणावळ्याच्या पलीकडे गाडी बाहेर पडणार, अशी माहिती यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे.
अजित पवार जेव्हा वाहतूक कोंडीत अडकतात...
पुण्यात आणि मुंबईत अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. मुंबई आणि पुण्यातील लोणावळ्यात येणारा पर्यटक नेहमीचं अभूतपूर्व वाहतूक कोंडीला सामोरा जातो, आज याच वाहतूक कोंडीचा सामना दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील करावा लागला. याचवेळी एबीपी माझा ने त्यांना गाठलं, या वाहतूक कोंडीतून त्यांचा प्रवास नेमका कसा सुरू होता, ते देखील कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
लोणावळ्यात सर्रास ड्रग्स विक्री, हे मी खपवून घेणार नाही - अजित पवार
लोणावळ्यातील परिस्थिती गंभीर होत आहे, अतिशय चुकीचे प्रकार इथं घडत आहेत. ड्रग्सचा वापर होताना दिसतोय, या नव्या पिढीला बरबाद करण्याचे, त्यांना व्यसनाधीन करण्याचे अधिकार कोणी दिलेले नाहीत. त्यामुळं मुंबईत बैठक घेऊन मी पोलिसांना याबद्दल कडक आणि कठोर कारवाईचे आदेश देणार आहे. मी पोलिसांना आज वोर्निंग देतोय, यापुढं जिथं कुठं ड्रग्सचे प्रकार आढळतील, तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मी कारवाई करणार. मी अजिबात हे खपवून घेणार नाही, गृह विभागाला सांगून मी कारवाईला करायला लावणारच, अशी तंबी अजित पवारांनी आधिकाऱ्यांना दिली आहे.
अगदी माझं हॉटेल असलं तरी तिथं कारवाई व्हायला हवी. चिरीमिरीसाठी कारवाई टाळू नका. हफ्ते देणाऱ्यांवर कारवाई करणार नाही आणि हफ्ते न देणाऱ्यांवर कारवाई करणार, असं अजिबात चालणार नाही. एमडी, एमए, गांजा, चरस विक्री होते. तुम्ही सांगा होतं का हे? हात वर करा, अरे तुमच्यासाठी करतोय मी, हात वर करा, तुम्ही काय भेकड आहात की काय? हा, आता बघा इतके लोक हात वर करतायेत, म्हणजे हे घडतंय. मग पोलिसांनी हे पहावं. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही गुन्हे दाखल करा, चांगली कलम लावा. लोणावळा सुरक्षित वाटायला हवं असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.