Ajit Pawar : अखेर महायुतीत अजित पवारच 'दादा'; सत्तेत सामील झाले, पुण्याचे दौरे केले, बैठका घेतल्या आणि पालकमंत्री पद मिळवलंच!
राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
पुणे : पुण्याचे दादा कोण?, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरु होत्या. अखेर पुण्याचे 'दादा' ठरले आहेत. अजित पवारांना (Ajit Pawar) पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. महायुतीत सामील झाल्यापासून आणि उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्रीपदावर डोळा होता. हे पद मिळावं यासाठी त्यांनी पुणे शहरावर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. अखेर राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरचे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील पण बैठका घ्यायचे अजित पवार
मागील काही महिन्यांपासून चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असून सगळ्या बैठका अजित पवार घेत असल्याचं दिसत होतं. अजित पवार मागील अनेक वर्षांपासून पुण्यात काम करत आहेत. पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती देखील अजित पवार यांना आहे. यापूर्वीदेखील कोरोनाकाळात अजित पवार पुण्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी पुणे शहरात त्यांनी चांगली कामगिरी पार पाडली होती. त्यामुळे अनेकांकडून अजित पवारांना पालकमंत्री करा, अशा प्रतिक्रिया येत होत्या. शिवाय अजित पवारांना तुम्हीच सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी पालकमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
चंद्रकांत पाटीलांच्या समोर होतं अजित पवारांचे आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी पुणे जिल्ह्याची ओळख आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित विकासकामे, अन्य प्रश्न, रखडलेले प्रकल्प याबाबत अजित पवार आठवड्यातून एकदा बैठक घेत होते. परंतु राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. चंद्रकांत पाटील पालकमंत्री होते तरीही पुण्यात प्रशासकीय बैठका घेणं अजित पवारांनी मात्र कायम ठेवलं होतं. त्यामुळे सत्तेत असूनही चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवार यांचं आव्हान असल्याचं म्हटलं जात होतं.
दोन दादांमध्ये कुरघोडी
मागील काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये कुरघोडी पाहायला मिळाली. अनेक कार्यक्रमात दोघेही एकमेकांचे शाब्दिक चिमटे काढताना दिसत होते. दोघेही एकमोकांसमोर येण्याचं टाळत असल्याचं बोललं जात होतं. त्यात अजित पवार हे नाराज असल्याच्याही चर्चा रंगत होत्या. पण अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन आपल्याला जे हवं ते पद मिळवलं, असं आता बोललं जात आहे.
इतर महत्वाची बातमी-