Ajit Pawar : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्स; अजित पवारांचं 'दादा स्टाईल' उत्तर, म्हणाले राज ठाकरे...
Ajit Pawar : अलीकडे अशा प्रकारचे बॅनर्स लावण्याचं फॅड निघालं आहे. यापूर्वीही अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
पुणे : मागील काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar ) मुख्यमंत्री होणार या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना हा प्रश्नदेखील विचारला जातो आणि शहरात अनेकदा बॅनर्सदेखील लावण्यात आले. आता पुन्हा एकदा पुण्यात अजित पवार भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर आता पुन्हा एकदा अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडे अशा प्रकारचे बॅनर्स लावण्याचं फॅड निघालं आहे, यापूर्वीही अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आले आहेत. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा लागतो. ज्यांना हा पाठिंबा मिळतो तो मुख्यमंत्री होतो, असं ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स लागले आहेत. राज ठाकरे, पंकजा मुंडे यांचेदेखील बॅनर लागले आहेत. काही दिवसांपूर्वी आमचे मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले होते. हा सगळा कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. हे बॅनर्स लावायला आम्ही सांगत नाही आणि मुळात बॅनर्स लावून कोणी मुख्यमंत्रीदेखील होत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
145 मॅजिक फिगर कोण गाठणार?
मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा लागतोलागतो. ज्यांना तो आकडा गाठता येतो तो मुख्यमंत्री बनतो. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांनी हा आकडा गाठला आणि ते मुख्यमंत्री झाले, असं ते म्हणाले.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
अजित पवारांच्या विकास पर्वाला पुणेकरांनी स्वागत करुन आशीर्वाद दिला आहे. मागील 25 वर्ष माझं आणि पुण्याचं वेगळं नातं आहे. अनेक वर्ष मी पुण्यात शिक्षण घेतलं आहे. मात्र असं अभूतपूर्वी स्वागत मी यापूर्वी कधीही पाहिलं नाही. 2024 नंतर अजित पवार मुख्यमंत्री होती. आता आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे 2024 मध्येच आता नवा मुख्यमंत्री होईल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
अजित पवार यांचं पुण्यात जंगी स्वागत अन् रोड शो..
बारामतीनंतर अजित पवारांचं पुण्यात जंगी स्वागत करण्यात आलं. फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात अभिषेकदेखील केला. त्यानंतर त्यांच्या भव्य रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळीदेखील कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.
इतर महत्वाच्या बातम्या: