Ajit Pawar : जरंडेश्वर कारखान्याची चौकशी ही जुन्या काळातील, अजित पवारांचा काही संबंध नाही; दादांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण
ACB To Investigate Jarandeshwar Sugar Factory : अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करण्यात येत आहे, पण ती जुन्या काळातील असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पुणे : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) चौकशीबाबत अजित पवारांच्या (Ajit Pawar) कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून करण्यात येत असलेली ही चौकशी जुनी असून त्याच्याशी अजित पवारांचा काही संबंध नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत असलेली ही चौकशी 1990 ते 2010 या दरम्यान जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांची आहे. या चौकशीचा अजित पवारांशी संबंध नाही. कोरेगाव तालुक्यातील कारखान्याच्या सभासदांकडून डिसेंबर 2021 मध्ये चौकशीसाठी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 1990 ते 2010 या कालावधीत कारखान्याचे संचालक मंडळ, त्यांचे नातेवाईक अणि प्रशासक यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2022 पासून सुरू असलेल्या चौकशीची माहिती 17 मे 2024 ला तक्रारदाराला पत्राद्वारे देण्यात आली.
जरंडेश्वर कारखान्याची चौकशी सुरू
सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात जरंडेश्वरशी संबंधित राजेंद्र घाडगेंना समन्स बजावण्यात आलंय. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांशी संबंधित असल्याचं बोललं जातंय. जरंडेश्वर कारखान्यातला गैरव्यवहार, कोरेगावमधला एक भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. लोकसभेसाठीचं मतदान संपताच जरंडेश्वर प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू झाल्यानं त्याच्या टायमिंगची चर्चा सुरू झाली.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती.
तो मूळ किमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे.
याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.
हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला.
नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडेतत्वावर देण्यात आला.
जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सॉईल प्रा.लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे.
ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.
ईडीनं चार्जशीटमधून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव वगळलं होतं.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणात राष्ट्रवादीचं नाव घेता 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत अजितदादा महायुतीत गेले आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा झाले. पण वर्षं उलटलं तरी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सातत्यानं होत असते.
लोकसभेच्या राज्यातील पहिल्या चार टप्प्यातील मतदान संपल्यानंतर, पाचव्या टप्प्यामध्ये अजित पवारांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय. या पाचव्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि परिसरातील मतदान होतं. पाचव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता अजित पवारांशी संबंधित कारखान्याची चौकशी करण्यात येत आहे.
ही बातमी वाचा: