Ajit Pawar: पिंपरी मतदारसंघासाठी महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही! अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव, भाजपचा राष्ट्रवादीला विरोध
Ajit Pawar: पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरूवात केली आहे तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आहे.
पुणे: विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांनी जागावाटपाच्या संबधी बैठका, चर्चा सुरू केल्याचं चित्र आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी जागांवरून पेच निर्माण होताना दिसत आहे. पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरूवात केली आहे तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे.
पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे. लोकसभेत कमळाचा उमेदवार मिळाला नाही आता आम्हाला कमळाचाचं उमेदवार हवा अशी आग्रही भूमिका बैठकीत एकमुखाने मांडण्यात आली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखेंसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी विरोधी सूर लावल्याचं दिसून आलं. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही मग आपण घडाळ्याचा प्रचार का करायचा? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ठरल्याप्रमाणे ही मागणी महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार आहे, अशी माहिती आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवाराचा कमी मताधिक्याने पराभव झाला होता, त्यामुळे ही जागा भाजपची आहे, या जागेवर कमळ फुललं पाहिजे, लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने सर्व कामे केली, प्रचार केला. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीचा प्रचार केला नाही, त्यामुळे या ठिकाणी भाजपचाच उमेदवार द्यावी अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करणार असल्याचं भाजपचे विधान परिषदेचे आमदार उमा खापरे यांनी म्हटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंचा पिंपरी मतदारसंघावर दावा
पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. या निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल असं त्यांनी म्हटलं आहे, तर आण्णा बनसोडेंच्या दाव्यावर म्हणाले, आधी ही जागा आम्ही लढली होती, राष्ट्रवादीच्या उमेदवाराप्रती मतदासंघात नाराजी आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवा, या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा मतदार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना देखील मी सुचित केलं आहे, ही जागा अजितदादांना सुटली तर या प्रश्वावर बोलताना ते म्हणाले, महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यातील कोणत्याही उमेदवाराला जागा मिळाली तरी आम्ही प्रामाणिकपणे त्याचा प्रचार करू असंही बारणे यांनी म्हटलं आहे.
अण्णा बनसोडे काय म्हणाले?
राज्यातील अनेक पक्ष महायुतीत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मी गेली पाच वर्षे काम करत आहे. ज्या पक्षाचे ज्या-ज्या ठिकाणी आमदार अशणार आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाला ती उमेदवारी किंवा ती जागा सोडण्यात येणार आहे. पिंपरीसाठी अजित दादा आग्रही असतील असा माझा अंदाज आहे, त्यांना ती जागा सोडायचा निर्णय दादा घेतील असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.