(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aaditya Thackeray : ज्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या आदेशावरुन महाराष्ट्राला लुटलं त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू, आदित्य ठाकरेंचा घणाघात
Aaditya Thackeray : पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवा खेळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या युवासेनेच्या क्रीडा महोत्सवाला आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली.
पुणे : 'सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे आमचं, राज्याचं कुणाचच ऐकत नाहीयेत, ते फक्त गुजरातचं ऐकत आहेत. ज्या मुख्यमंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरुन लुटलं त्या सर्वांना जेलमध्ये टाकू'. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला. 10 वर्षांपासून ऐकतोय अच्छे दिन येणार कधी येणार? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. पुढे त्यांनी म्हटलं की, आता लोक गाजर घेऊन सत्तेत बसलेत. त्यामुळे हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आणि आपलं सरकार नक्कीच सत्तेत बसणार असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे युवा खेळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या युवासेनेच्या क्रीडा महोत्सवाला आदित्य ठाकरेंनी देखील हजेरी लावली. तसेच त्यांची सभा देखील पुण्यात पार पडली. पुण्यातील सणस मैदानाच्या बाहेर आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
त्या सर्वांना तुरुंगात टाकू - आदित्य ठाकरे
ज्या मुख्यमंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरुन लुटलं त्या सर्वांना जेलमध्ये टाकू. राज्याचं राजकारण यांनी गढूळ केलंय. शहरं कोलमडत चालील आहेत. राज्यात सध्या भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकरी देखईल आत्महत्या करतायत. राज्यातली कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य व्यवस्था सगळी कोलमडलीये. स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटलेत. त्यात देखील मोठा घोटाळा झालाय, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर घणाघात केला.
आदित्य ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा
यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, जे पालकमंत्री पद तुम्ही भांडून, लढूनन मिळवलं होतं. ते पालकमंत्री पद तुमचं गेलं तेव्हा तुम्ही काय केलंत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय.
आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक
आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करतो. कर्ज मुक्तीचा निर्णय आपण घेतला. कोविडमध्ये आपण काम केलंय. सगळ्यांनी आपलं हे हिंदुत्व सुखरुप ठेवसं. आज महिलांवर अत्याचार होतात माझी भगिनी सेफ नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत.
दावोअ दौऱ्याचा आदित्य ठाकरेंकडून उल्लेख
मागच्या वर्षी 2 दिवसांत दावोसमध्ये 40 कोटी रुपये खर्च झालेत. आता 50 लोक घेऊन मुख्यमंत्री गेले. त्यांना बहुतेक 50 हा आकडा खूपच आवडतोय. यांनी सुट्ट्या म्हणून मज्जा केली. तुम्ही राज्यात नेमकं काय आणलं ते सांगा असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला विचारला आहे.
अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलंय - आदित्य ठाकरे
अवकाळी पावसासारखं अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे. यांनी सांगितलं होतं, की मी राष्ट्रवादीसोबत जाणारच नाही. आज त्यांचीच युती कोणाशी आहे ते सांगा. आधी ओरडत होते आम्हाला वित्त मिळत नाही वित्त मिळत नाही, आता वित्त खातं नेमकं कोणाकडे आहे ते सांगा, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली.