Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे . मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अवमानकारक भाषा वापरून सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे.
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (bhaskar Jadhav) यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्याविरोधात अवमानकारक भाषा वापरुन सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात जाधवांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळमध्ये (Kudal) भाषण करताना जाधव यांनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्यानंतर कुडाळ आणि अन्य ठिकाणीही भास्कर जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग येथील कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली होती. सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डेक्कन पोलिसांमध्ये योगेश अरुण शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन जाधव यांच्याविरोधात कलम 500, 501, आणि 502 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य अंगलट आलं
नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांच्या प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने अर्वाच्छ भाषेत वक्तव्य केलं होतं. त्यांचा उपहासात्मक उल्लेख करुन सामाजिक भावना दुखावल्या आणि राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक, भावनिक तेढ निर्माण केली, असा आरोप जाधव यांच्यावर आहे. त्यामुळे राणेंविरुद्ध केलेलं वक्तव्य जाधवांच्या चांगलंच अंगलट आल्याचं चित्र आहे.
कुडाळमध्येही गुन्हा दाखल
राणेंविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भादरत होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं.