Pune Vaishali hotel: बनावट सह्या करुन चार कोटींची फसवणूक; वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीविरोधात पोलिसांत धाव
Pune: वैशाली हॉटेलच्या मालकीण निकिता शेट्टी यांनी आपल्या पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फसवणूकीचा आरोप केला आहे.
पुणे : पुण्यातील (Pune) प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या (Hotel Vaishali) मालकीण निकिता शेट्टी आणि त्यांच्या पतीचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पतीने बनावट सह्या करुन, फ्लॅट तारण ठेवून 4 कोटी 97 लाख 5 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोप वैशाली हॉटेलच्या मालकीण निकिता शेट्टी यांनी पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. निकिता शेट्टी यांनी त्यांच्या पतीविरोधात आणि कर्ज देणाऱ्या कंपनीच्या आधिकाऱ्यांविरोधात तक्रारही केली आहे.
याप्रकरणी निकिता जगन्नाथ शेट्टी (वय 34, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजीत विनायकराव जाधव (वय 41), डी एस ए (आर आर फायनान्सचे) रवी परदेशी आणि कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश देवचंद्र चौधरी (वय 42, रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या कार्यालयात निकिता शेट्टी यांचे पती विश्वजीत जाधव यांच्या मिटींग सुरु असायच्या. याच मिटींगमध्ये हा कट रचला गेला. वैशाली हॉटेलच्या मालकिणीच्या खोट्या सह्या करुन बनावट कागदपत्र तयार केले. हॉटेल वैशालीच्या मालकिणीच्या मालकीचा फ्लॅट गहाण ठेवला आणि त्या बदल्यात कर्ज घेतलं. 4 कोटी 97 लाख 5 हजार रुपये एवढी या कर्जाची किंमत होती. डेक्कन पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
4 वर्षाच्या मुलीला घेऊन पती दोन महिन्यांपासून बेपत्ता...
काही दिवसांपूर्वी हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी आता त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांचा पती मागील दोन महिन्यापासून बेपत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणी निकिता शेट्टी यांनी केली होती. विश्वजीत जाधव असं त्यांच्या पतीचं नाव आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असूनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला होता. हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नी बंदुकीचा धाक दाखवून पतीने नावावर करून घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दोन महिन्यांपासून मी माझ्या मुलीचा चेहरा पाहिला नाही. तिची आणि माझी भेट घडून आणावी अशी विनवणीही निकिता शेट्टी यांनी पुणे पोलिसांकडे केली होती.
हेही वाचा-