POP मूर्तींचे निर्माते अन् शाडू मातीचे मूर्तिकार एकमेकांना भिडले; पालिकेच्या बैठकीत हाणामारी, पाण्याच्या बाटल्या, खुर्च्याही एकमेकांवर फेकल्या
गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांची बैठक बोलवली होती.

मुंबई: गणेशोत्सव (Ganesh Utsav) पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेल्या मूर्तिकारांची बैठकीत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बैठकीत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. पीओपी मूर्तींच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणीत जखमी झाले असून याप्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली. ही बंदी येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील गणेशोत्सवातही लागू राहणार असून त्यानुसार आतापासूनच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांची बैठक बोलवली होती. परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते यांना बोलावण्यात आले होते. मात्र या बैठकीत हाणामारी झाली.
सर्व याचिकांवर 5 मे रोजी एकत्रित अंतिम सुनावणी-
तुम्ही पीओपी मूर्तींचा पर्यायच ठेवला नाही तर लोक शाडूच्या मातीच्याच मूर्ती विकत घेतील. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीत काय होते, याची प्रतीक्षा न करता तुम्ही आताच पीओपीला असलेल्या पर्यायांचा अवलंब करायला हवा. दूरदर्शी व जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही हे करायला हवे. कारण ते भावी पिढ्यांसाठीही चांगले ठरेल, असा सल्लाही मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीत पीओपी समर्थक याचिकाकर्त्या मूर्तिकारांना दिला. तसेच याप्रश्नी सर्व याचिकांवर 5 मे रोजी एकत्रित अंतिम सुनावणी घेण्याचे संकेतही न्यायालयाने दिले.
गणेश मंडळांची रोखठोक भूमिका-
या सगळ्या मुद्द्यावर गणेश मंडळांनी ही रोखठोक भूमिका घेतलेली आहे. पीओपीच्या मूर्तीने पर्यावरणाची हानी होत असेल तर पुण्यातील मुळा-मुठा नदीची हानी का झाली असा सवाल उपस्थित केला आहे. तर शासनाने न्यायालयाच्या इतर निर्णयांकडे सुधा लक्ष द्यायला हवे. तसेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अनेक सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ हे समुद्र किनारी अवशेष उचलण्यासाठी पोहचतात ही बाब निर्देशनास आणण्याच प्रयत्न केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा फक्त पीओपी ने होतो हे आम्हाला खटकत आहे असे उघड मत आता मंडळांनी मांडलं आहे.


















