Ajit Pawar: सैफ अली खानच्या घरी आरोपी चोरीसाठी का आला? अजित पवारांनी सांगितलं कारण, माध्यमांवरही मिश्किल टोलेबाजी
Ajit Pawar: अजित पवारांनी आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बऱ्याच घडामोडींवरती भाष्य केलं आहे, त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या निवडणुकीचा एक किस्सा देखील सांगितला आहे.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कायमच आपल्या वेगळ्या उत्तराने आणि आपल्या परखड भाषणाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अशातच आज (21 जानेवारी) अजित पवारांनी (Ajit Pawar) सैफ अली खान यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने केलेल्या हल्ल्या आणि या सर्व प्रकरणावरती मध्यमांसह विरोधकांनी केलेल्या टीकेवर त्यांनी उत्तर दिलं. यावेळी आपल्या मिश्किल अंदाजात त्यांनी माध्यम आणि विरोधकांना थोडा धीर धरण्याचा आवाहन देखील केलंय.
मुंबईतील पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी 16 जानेवारीला बारामतीच्या दौऱ्यावरती होतो. तिथे माझ्यासोबत कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे, माणिकराव कोकोटे होते त्याचबरोबर आणखी काही नेते होते, त्यावेळी मला सकाळी तिथे पोहोचल्यावर लगेच माध्यमांनी विचारायला सुरू केलं. सैफ अली खानवर काल रात्री उशिरा हल्ला झाला आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? मला काय झालंय, कसं झालंय, कुठं हल्ला झाला काहीच माहिती नाही, आणि दुसरीकडे विरोधक मुंबईची कायदा व्यवस्था ढासळली म्हणायला लागले, असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला आहे.
चोराने सैफ अलीच्या घरी चोरी का केली?
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, आता सैफ अली खानच्या घरातील घटनेची माहिती समोर आली आहे. तो कसा वरती घरात गेला, त्याला चोरी करताना माहिती नव्हतं, ते सैफ अली खानचं घर आहे, श्रीमंत लोक इथे राहतात असं त्याला माहिती होतं, त्याला बांगलादेशला परत जाण्यासाठी पन्नास हजार रूपये परत होते, म्हणून त्यांनी तिथे चोरी करायला गेला, या घटनेनंतर तर विरोधक आमच्यावर टीका करत होतेच, पण कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून आम्हाला बोलतात. मी म्हणतो थोडी कळ काढा. थोडा धीर धरा, सगळं काही समोर येत, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
चुकीच्या गोष्टीवर टीका- टिप्पणी करणे हा शंभर टक्के मीडियाचा अधिकार आहे. त्याबाबत दुमत असायचं काहीच कारण नाही. पण वाईट आहे, त्याला वाईट आणि चांगला आहे, त्याला चांगला म्हटलं. तर त्यात काही बिघडत नाही. ते पण अत्यंत आवश्यक आहे. सकारात्मक घडामोडी घडत असताना त्या गोष्टी देखील समाजासमोर येणं आवश्यक आहेत, असं माझं स्वतःचं मत आहे, असेही पुढे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
अजितदादांनी सांगितला तो निवडणुकीचा किस्सा
काही वेळेला चुकीच्या बातम्या दिल्या जातात. त्याचा वेगळा परिणाम देखील दिसतो, असंही अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी त्यांचं एक उदाहरण दिलं आहे. 23 तारखेला मतमोजणी होती. त्याच्या आदल्या दिवशी 22 तारखेला देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी होते, एकनाथ शिंदे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थान येथे होते, तर आम्ही देवगिरीवर होतो, संध्याकाळच्या वेळी आम्ही बातम्या बघत होतो. तेव्हा आमच्या विरोधकांची कुणाला कुठलं डिपार्टमेंट द्यायचं याची चर्चा सुरू होती, महाविकास आघाडीतल्या शिवसेनेने हॉटेल बुक केलं होतं, राष्ट्रवादीने हॉटेल बुक केलं होतं, काँग्रेसने हेलिकॉप्टर, विमान तयार ठेवलेली होती. सगळं प्लॅनिंग झालं होतं. त्यावेळी मी देवेंद्रजींना फोन केला. त्यावेळी तेही म्हणाले मी पण बघतोय टीव्ही काय चाललं आहे, ते मला पण कळेना, अनेक चर्चा सुरू होत्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणीला सुरूवात झाल्यावर सकाळी मी देवगिरी बंगल्यावर टीव्ही बघत होतो, एका चॅनलने दाखवलं अजित पवार पोस्टल बॅलेटमध्ये मागे आहेत. बातमी चालली आमच्या मातोश्रीनी काटेवाडी मध्ये मंदिराच्या समोर बसून माळ जपायला सुरू केली. मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला. बातम्या अशा दाखवत आहेत. आई काळजी करत आहे. मी नंतर त्या चॅनलला फोन केला. मी संबंधितांशी बोललो ते लोक सांगायला लागले पहिल्यापासून पोस्टल बॅलेटला पडणाऱ्या मतांमध्ये 75 टक्के मतं तुम्हाला आहेत आणि 25% मतं समोरच्याला आहेत. त्यांना म्हटलं चॅनलला बातमी चालत आहे. त्यावेळी ते म्हणाले दादा अशी बातमी दाखवल्याशिवाय आमचा टीआरपी वाढत नाही आणि नंतर काढणारच आहे. काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर सांगणारच आहे, तुम्ही किती मतांनी पुढे आहेत ते. मी त्याला म्हटलं, माझी आई 87 वर्षाची आहे, मी पराभूत होतो की काय असा जर तिने धसका घेतला तर तर काय, सांगायचं तात्पर्य इतकाच आहे, आपल्या हातात आहे म्हणून काहीही दाखवायला नको असं म्हणत त्यांनी सकारात्मक गोष्टी देखील माध्यमांनी दाखवाव्या असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं आहे.
मी जरा दिसलो नाही की, नॉट रिचेबल...
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मिडिया ट्रायलची किंमत मी मोजली आहे. 70 हजार कोटींचा घोटाळासंदर्भात किती बातम्या दाखवल्या गेल्या. अजूनपर्यंत विविध चौकशी सुरू होत्या. बातमी दाखवताना संवेदनशीलता हवी. या टीआरपीने नको नको ते करून ठेवलं आहे. मी जरा दिसलो नाही की, अजित पवार नॉट रिचेबल बातम्या सुरू होतात. रोज येवून रिचेबल व्हावं काय. त्या सुत्रांना एकदा मी घेवून बसणार आहे. त्या सुत्रांनाही तुम्ही एखादा जीवनगौरव पुरस्कार द्यावा, असंही अजित पवारांनी मिश्किलपणे म्हटलं आहे.