मविआ-वंचित युतीच्या सर्व शक्यता मावळल्या, अकोल्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार दिल्याने विषयच संपला
Congress Announced Candidate against Prakash Ambedkar : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.

Congress Announced Candidate against Prakash Ambedkar : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधातच उमेदवार दिला आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्याने अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील समावेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
अकोल्यात तिरंगी लढत पाहायला मिळणार
महाविकास आघाडीचे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचे चर्चेचे दरवाजे आता पूर्णपणे बंद झाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने दिली डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काँग्रेसकडून अकोल्यात अभय पाटील उमेदवार
वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने सोडलेली पाहायला मिळत होती. शिवाय इतर चार जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला होता. मात्र, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये शेवटपर्यंत एकवाक्यता आली नाही. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी 8 उमेदवारांची घोषणा करत मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, तरिही काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, काँग्रसने अकोल्यातून उमेदवार जाहीर करुन प्रकाश आंबेडकरांसोबतच्या आघाडीच्या चर्चा संपवल्या आहेत.
वंचितला सोबत घेण्याचे दरवाजे बंद
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस पक्षाला सात जागांवर बाहेरून पाठिंबा देण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवला होता. तर दुसरीकडे अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस कडून पाठिंबा दिला जाईल, अशा प्रकारच्या प्रस्तावाची चर्चा होती. मात्र असा असताना सुद्धा आता थेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधातच महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाकडून डॉ अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडी सोबत येण्याचे दरवाजे जवळपास बंद झाल्याचं चित्र आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
