![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; मनसेलाही लगावला टोला
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
![शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; मनसेलाही लगावला टोला Vasant More took a big responsibility by Uddhav Thackeray; MNS also attacked, As soon as Shivbandhan was built by vasant more शिवबंधन बांधताच उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंना मोठी जबाबदारी; मनसेलाही लगावला टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/819a277a4c86055793a0d2a4bf3bc1d517205176361091002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेल्या वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी 9 जुलै रोजी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार, आज गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठली. पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेता आलेल्या पदाधिकाऱ्यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यावेळी, बऱ्याच दिवसांनी पाऊस आला, आणि पावसासोबत वसंतही आला, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वसंत मोरेंचे स्वागत केले. तर, उद्धव ठाकरेंनीही वसंत मोरेंचे पक्षात स्वागत करताना, तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात, तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात. मात्र, तुम्हाला शिवसेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी, असे म्हणत आता पुण्यात (Pune) शिवसेना आणखी वाढवा, हीच जबाबदारी मी देत असल्याचे म्हटले.
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्याहस्ते वसंत मोरेंसह त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन बांधले. यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार सचिन अहीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, भाषण करताना वसंत मोरेंनी आता पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचे म्हटले.
उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेंना चिमटा काढला. शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मान-सन्मान मिळतो, कसा अपमान केला जातो, असे म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणुकीवरुन अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ''शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालयाच हवी, ती वसंत मोरेंनाही मिळायला पाहिजे. मी वसंत मोरेंसह तुम्हालाही शिक्षा देतोय. मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची ती लढाई होती. आता, गद्दारी, धोकेबाजी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे. पुणे हे उद्याच्या सत्ताबदलाचं केंद्र असणार आहे, सत्ताबदलाचा जो पाया आहे, खडकवासल्यातून आणलं म्हटल्यावर खडक आहे. मी बरेच दिवसात पुण्यात आलो नाही, आता येईन तो शिवसैनिकांसाठी येईन. तेव्हा आपले सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना बोलवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना केलं. पुण्यात एकेकाळी शिवसेनेचे 5 आमदार होते, तो काळ मला पुन्हा आणायचा आहे. पुणे हे पुन्हा मला भगवंमय करायचं आहे. त्यासाठी, मी तुन्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंसह मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांकडे पुण्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारी दिली आहे.
पावसासोबत वसंतही फुलला
वसंत मोरेंची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे, ते शिवसैनिक आहेत. त्यामुळे, ते शिवसेनेत येतील याची मला खात्री होती. बऱ्याच दिवसांनी पाऊस आला आहे, आणि पावसासोबत वसंतही फुलला आहे, असे संजय राऊत यांनी म्हणतात उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर, आपल्याला एक चांगला शिवसैनिक मिळाला आहे, आपण सर्वांनी मिळून पुण्यातील शिवसेना वाढवुयात. तुम्हाला सामील करुन घेताना आम्हाला आनंद होत आहे, असे राऊत यांनी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)