Sujat Ambedkar: ...तर राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडी करेल; सुजात आंबेडकरांचं थेट इशारा
Sujat Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आणि युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल वाशिमच्या आसेगाव येथे सभेदरम्यान बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
वाशिम: वंचित बहुजन आघाडीने राज्यात विविध विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार घोषित केले आहे. तसेच त्या उमेदवारांचा जोरदार प्रचार देखील सुरू केला आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे पुत्र आणि युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी काल वाशिमच्या आसेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. या सभेदरम्यान बोलताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) चांगलीच सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमध्ये वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचितचे कार्यकर्ते करतील
यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी थेट इशारा देत मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढत असल्याचे ते म्हणाले. आम्ही मोठमोठे स्पीकर लावू, भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू, मात्र त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील, अस वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी यावेळी केलंय. त्यामुळे येत्या काळात वंचित बहुजन आघाडी विरुद्ध मनसे असा वाद रंगण्याची शक्यता आहे. तर पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदा औरंगजेब याच्या कबरवर कुणी गेले असेल ते बाळासाहेब आंबेडकर हे गेले होते. जेंव्हा केंव्हा मुस्लिमांवर संकट येतील त्या वेळेस केवळ वंचित बहुजन आघाडी मदतीला येईल, असं वक्तव्य देखील सुजात आबेडकरांनी केलंय.
नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर
मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते, ते म्हणतात आम्ही मोठमोठे स्पीकर लावू. भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू. मात्र, त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील, असं सुजात आंबेडकर म्हणाले. जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्यांच भलं होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की 15 टक्के मुस्लीम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष 15 टक्के त्यांना भागीदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यांनाच मतदान करून आपल्याला विजय करायचे आहे, असं सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केलं. दरम्यान आगामी विधानसभा वाशिम जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देतेय हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा :