Uddhav Thackeray-Raj Thackeray: बिनविरोध निवडणुकांवर उद्धव ठाकरेंनी पर्याय सांगितला; 'जेन-झी'चा मुद्दाही मांडला, राज ठाकरेंसमोर काय म्हणाले?
Uddhav Thackeray-Raj Thackeray: राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीआधीच जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावर देखील ठाकरे बंधूंनी हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray-Raj Thackeray मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'सामना 'साठी संयुक्त मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यामध्ये राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीआधीच जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावर देखील ठाकरे बंधूंनी हल्लाबोल केला.
आपण प्रत्येक वेळी म्हणतो, मतदान माझा हक्क आहे. पण मग आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेतायना? हा पायंडा प्रत्येक ठिकाणी पडता कामा नये. अशा ठिकाणी 30 टक्के लोकांनी म्हटलं की, हा आम्हाला नको तर त्याला बाद केलं पाहिजे, असं महेश मांजरेकर म्हणाले. यावर काय आहे की, व्होटिंग पॅडवर 'नोटा'चा अधिकार आहे. पण त्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. ठाकरे बंधूंच्या या संयुक्त मुलाखतीमध्ये बिनविरोध निवडणुकीवरुन कोणी कोणते मुद्दे मांडले जाणून घ्या...(BMC Election 2026)
महेश मांजरेकर- आपण प्रत्येक वेळी म्हणतो, मतदान माझा हक्क आहे. पण मग आता जे बिनविरोध निवडून आलेत, त्या ठिकाणी मतदारांनी बोटावरचं काळं कसं दाखवायचं? म्हणजे माझा मतदानाचा हक्कच तुम्ही हिरावून घेतायना? हा पायंडा प्रत्येक ठिकाणी पडता कामा नये. अशा ठिकाणी 30 टक्के लोकांनी म्हटलं की, हा आम्हाला नको तर त्याला बाद केलं पाहिजे.
राज ठाकरे- काय आहे की, व्होटिंग पॅडवर 'नोटा'चा अधिकार आहे. पण त्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे.
उद्धव ठाकरे- वाटलेल्या नोटांमुळे झालेला हा प्रॉब्लेम आहे.
महेश मांजरेकर- जे बिनविरोध आलेत तिथं नोटा दाबायलाही चान्स नाही...
राज ठाकरे- एक्झॅक्टली! कारण नोटा मिळाल्या ना...
उद्धव ठाकरे- यावर उपाय म्हणजे जसं एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि त्यात काही गफलत वाटली तर री-टेंडर काढलं जातं. तसंच तिथली निवडणूक प्रक्रिया नव्यानं घेतली पाहिजे. पण निवडणूक आयोगानं काय केलं? निकाल थांबवलाय, तो सर्व निकालाबरोबर जाहीर करणार, कारण आयोग त्यांचा गुलाम आहे. बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकही उमदेवार नाही? पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही? हा काय योगायोग आहे की काय आहे? जेन-झी' हा एक शब्द आता सगळीकडं दरारा निर्माण करणारा झालेला आहे. या सगळ्या ठिकाणचे जेन झी जे पहिल्यांदा मतदान करणार होते, ते बिनविरोधमुळं खूप अस्वस्थ आहेत. त्यांच्या डोक्यात जी आग आहे, ती बाहेर आली तर मग ह्यांची हालत खराब होणार आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026)
























