(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maha Vikas Aghadi: किमान चार भिंतींच्या आडतरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा; ठाकरे गटाची भूमिका, काँग्रेस, शरद पवार मान्य करणार?
Maha Vikas Aghadi News : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : राज्यातील आगामी विधान निवडणुकांचं बिगुल अद्याप वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. अशातच महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. तसं पाहायला गेलं तर यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार यात काही शंकाच नाही. पण, विधानसभा निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. 16 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाविकास आघाडीचा मेळावा पार पडलेला. यामध्ये बोलताना विधानसभा निवडणुकांपूर्वी (Vidha Sabha Election 2024) मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, जे नाव जाहीर केलं जाईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याचं कळतंय.
निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा; ठाकरे गटाची मागणी
16 तारखेच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत, त्या चेहऱ्याला आपला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला होता. परंतु, यावर काँग्रेस आणि शरद पवार गटानं ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळं पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच एका सार्वजनिक सभेत म्हटलं होतं. यामुळे एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, अशी भिती ठाकरे गटानं व्यक्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीआधी चार भिंतीच्या आड मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला जावा, अशी ठाकरेंची भूमिका असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
पाडापाडीच्या राजकारणाची ठाकरे गटाला भिती
निवडणुकांपूर्वी जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला, तर पाडापाडीचं राजकारण होतं, ते होणार नाही. दरम्यान, यापूर्वीही आघाडी किंवा युतीमध्ये आपण पाहिलं आहे की, विधानसभा निवडणुकीत ज्याचे सर्वाधिक आमदार निवडून आले, त्याचाच मुख्यमंत्री होतो. त्यामुळे पाडापाडीचं राजकारण होऊ शकतं, हाच धोका महाविकास आघाडीतही आहे, म्हणून मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर केला, तर पाडापाडीचं राजकारण होणार नाही, असं ठाकरेंचं म्हणणं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांसाठी चेहरा महत्त्वाचा असल्याचं वारंवार ठाकरे गटाच्या वतीनं सांगितलं जात आहे. अशातच आता ठाकरेंनी थेट भूमिकाच घेतल्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्ष काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : Thackeray Group : विधानसभा निवडणुकीपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, ठाकरे गटाची भूमिका