Uddhav Thackray : धनुष्यबाण ते मशाल हे स्थित्यंतर कसं होतं? उद्धव ठाकरेंनी नेमकं कुणाला जबाबदार धरलं, म्हणाले निवडणूक आयोग त्यांचा...
Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील फूट, निवडणूक आयोगाचा निर्णय आणि लवादाचा निर्णय यावर भाष्य केलं.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे(Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दैनिक सामनाला लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, संविधान, शिवसेनेतील बंड, राज्यातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं यासंदर्भात भाष्य केलं. शिवसेनेचे धनुष्यबाण ते मशाल हे स्थित्यंतर कसं झालं या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. धनुष्यबाण ते मशाल… हे का घडलं? कोणी घडवलं? लोकशाहीचे एक प्रकारे धिंडवडेच निघतायत. संविधान पाळलं जात नाहीये. पक्षांतर केल्यानंतर अपात्रतेची केस… अजूनही तिचा निकाल लागत नाहीये. वारंवार कोर्टानं फटकारे मारलेत. खडे बोल सुनावले, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तत्कालीन राज्यपाल म्हणून जे इकडे बसले होते, त्यांना सद्गृहस्थ म्हणायचं का काय म्हणायचं? त्यांनी अधिवेशन बोलावलं ते कसं चूक होतं, त्याच्यानंतर लवादाने दिलेला निर्णय कसा चूक होता, निवडणूक आयोगालासुद्धा हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? याचं कारण सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय, पक्ष कुणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत. म्हणजेच काय, जे मी म्हटलंय लोकशाहीचं वस्त्रहरण चाललंय आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजूनही याचा निर्णय आलेला नाहीये. सगळाच गोंधळ सुरू आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ:
सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल
सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार याची मला खात्री आहे. कारण तसं घटनेमध्ये नमूदच आहे. परिशिष्ट दहा! सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसेनेला, म्हणजे माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली, जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं, तिला ‘नकली शिवसेना’ म्हणतायत. याचा अर्थ उघड आहे… निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. लवादानेसुद्धा ते म्हणतील तसंच काम केलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आम्हाला हे चिन्ह किंवा नाव देऊ नये, असा अप्रत्यक्ष दबाव हे आपले प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयावरती आणतायत की काय, असा प्रश्न पडलेला आहे, असं उद्ध ठाकरे म्हणाले.
लोकशाही वाचवण्याची लढाई
आताची निवडणूक ही महाभारतासारखी चालली आहे. हे खरंच आहे. त्यावेळच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यावेळेला आपल्या देशातील लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय. म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे. स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता, त्या काळात आपण नव्हतो. ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं, त्या सर्व क्रांतिवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केलंच पाहिजे, असंही ठाकरेंनी म्हटलं.
संबंधित बातम्या :