''जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालतात''
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून त्याच पार्श्वभूमीवर बैठका आणि संवाद यात्रांचेही आयोजन केले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीतील जागावाटपासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन चर्चा करत आहेत. त्याच पार्श्वभूमीपर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन, शिवसेना शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष्य केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन ठाकरे गटाकडून सातत्याने टीका केली जाते. आता, ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाकडून प्रतिहल्ला केला जात आहे. आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच्या जागावाटपावरही भाष्य केलंय.
शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. त्यामध्ये सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, आप आणि टीएमसीच्या नेत्यांच्या भेटी उद्धव ठाकरे घेतील. या तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे भेटीसाठी जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सर्वोच्च सुनावणी दिल्लीत होत आहे, त्या पार्श्वभूमीवरही ते दिल्ली दरबारी आहेत. मात्र, ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावर आता शिंदे गटाकडून टीका करण्यात आलीय.
जे आम्हाला दिल्लीची पायपुसनी म्हणत होते, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. तसेच, संजय राऊत हे तर वाढपीच्या भूमिकेत आहेत. कोणाला लोणचं द्या, कोणाला पाणी भरून दे... जे एकेकाळी दिल्लीचे नेते महाराष्ट्रात जागा वाटपासाठी येत होते, आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे म्हणत संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
विधानसभेच्या जागावाटपावरुन इशारा
मराठा समाजाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र आरक्षण देऊन तेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. लोकसभेला खाल्लेली ठेच लक्षात घेता, आम्ही आमच्या जागा घेऊच पण यावेळी उमेदवार निश्चितीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही. आमच्या जागांचा निर्णय आम्ही घेऊ अशी स्पष्ट भूमिकाही संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली.
हेही वाचा
Video : ''मनोज जरांगेंचा फोटो घरात लावायचा, विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा''