Rajya Sabha Election 2022 : अपक्षांनी आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवलं तर सदस्यत्वाला धोका नाही, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. गिल्डा
अपक्षांनी आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखविल्यास त्याच्या सदस्यत्वाला धोका नसल्याची माहिती छत्तीसगढचे माजी महाअधिवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ कॉन्सिल अॅड. जुगलकिशोर गिल्डा यांनी दिली.
Nagpur: राज्यसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात राज्यातील लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांचे समर्थन कोणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अपक्षांचे 'मन' आपल्याकडे 'वळविण्यासाठी' सर्वच पक्ष प्रयत्न करत आहे. त्यामुळे अपक्ष आमदाराने आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवले तर, त्याच्या सदस्यत्वाला धोका आहे का? या सर्वांना पडलेल्या प्रश्नांचा उत्तर शोधण्यासाठी एबीपी माझाने छत्तीसगढ सरकारचे माजी महाअधिवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ कॉन्सिल अॅड. जुगलकिशोर गिल्डा यांच्याशी संवाद साधला.
अपक्ष आमदाराने आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवलं तर सदस्यत्वाला कुठलाही धोका नाही. दुसरीकडे जर एखाद्या पक्षाच्या आमदाराने आपल्या पक्षाविरुद्ध जाऊन मतदान केलं आणि ते प्रतोदाला दाखवलं तर त्यावर दहावं परिष्ठखाली स्पीकरकडे याचिका करू शकतो, पण अपक्षांना हे लागू नाही. सर्वोच्च न्यायालयात कुलदीप नायर केसमध्ये ओपन बॅलेट सिस्टिम ही राज्य सभा निवडणुकीसाठी वैध ठरवली होती.
राज्यसभा निवडणुकीत मतांचे गणीत जुळवून घेण्यासाठी सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजप अशा दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जात आहे. अशा वेळी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आमदार अपात्र ठरत नाही, अशी माहिती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालात समोर आली आहे.
निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची
मतदानानंतर आमदारांना आपल्या पक्षाच्या प्रतोदला मतपत्रिका दाखवण्याचं बंधन असतं. त्यावेळी क्रॉस व्होटिंग केल्याचा आक्षेप प्रतिनिधींनी घेतला तर निवडणूक अधिकारी ते मत बाद ठरवू शकतो, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा वेळी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते, असं मत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून याआधी काम पाहिलेले विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईत आमदारांची 'खास' व्यवस्था
आपल्या आमदारांना 'कनेक्टेड' ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना मुंबईला नेले असून उर्वरित आमदार मुंबईकडे कूच करत आहेत. त्यांची 'खास' सोय देखील करण्यात आली आहे. भाजपने आमदारांची सोय हॉटेल ताज प्रसिडेंटमध्ये केली आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकी हॉटेल ट्रायडेंटमध्ये होणार आहे.
आमदारांचे प्रशिक्षणही
मतांचे गणित काटेकोर असल्याने एकही मत बाद होणे हे पक्षांना परवडण्यासारखे नसल्याने असल्याने पक्षांनी आपल्या आमदारांसाठी विशेष प्रशिक्षण ठेवले आहे. यात त्यांना मतपत्रिकेवर प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच पहिली पसंद, दुसरी पसंद आदीबद्दल सखोल माहिती देण्यात येईल. तसेच ज्या चुकांमुळे मत बाद होऊ शकतात याबद्दलही सांगण्यास येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाचा