मावळ लोकसभेत महायुतीचा पराभव अटळ, जबाबदारी झटकण्याचं काम सुरू; शरद पवारांच्या नेत्याकडून जोरदार हल्लाबोल
Maval Lok Sabha: श्रीरंग बारणे आणि अजित पवार गट यांच्या आरोप प्रत्यारोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षानंही बारणेंवर घणाघाती टीका केली आहे.
![मावळ लोकसभेत महायुतीचा पराभव अटळ, जबाबदारी झटकण्याचं काम सुरू; शरद पवारांच्या नेत्याकडून जोरदार हल्लाबोल Sunil Gavhane Defeat of Mahayuti in Maval Lok Sabha Election is inevitable Mawal Lok Sabha Election 2024 Shrirang Barne vs Sanjog Waghere मावळ लोकसभेत महायुतीचा पराभव अटळ, जबाबदारी झटकण्याचं काम सुरू; शरद पवारांच्या नेत्याकडून जोरदार हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/22/409a9461f91cd33686835a06879ec94c1713765268514923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maval Lok Sabha Election 2024 : मावळ : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आतापर्यंत निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांत निवडणूक झाली असून आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. परंतु, निकालापूर्वीच महायुतीतली मोठी खदखद समोर आली आहे. श्रीरंग बारणे (Shrirang Barne) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Group) यांच्या आरोप प्रत्यारोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षानंही बारणेंवर घणाघाती टीका केली आहे. श्रीरंग बारणेंचा पराभव अटळ आहे, असं शरद पवार गटानं म्हटलं आहे.
मावळ लोकसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडलंय. मावळ लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आपला 100 टक्के प्रचार केला नसल्याची खंत श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवली आहे. प्रचार न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावं अजित पवारांकडे दिल्याचंही बारणे म्हणाले आहेत. त्यावर अजित पवार गटानं बारणेंना जोरदार प्रत्युत्तर देत अपयश लपवण्यासाठीच बारणे आरोप करत असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुनिल गव्हाणेंनी बारणेंवर टीका केली आहे.
सुनिल गव्हाणे म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या मावळ लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा पराभव अटळ आहे. हे समोर दिसताच महायुतीच्या नेत्यांमध्ये आता जबाबदारी झटकण्याचं काम सुरू आहे. मावळ लोकसभेतील हे चित्र थोड्याच दिवसांत सबंध महाराष्ट्रात देखील दिसेल."
काय म्हणालेले श्रीरंग बारणे?
काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळला नाही. मी याची लिस्ट अजितदादांकडे दिली होती. निवडणुकीत काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. पण सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झालं असतं. महायुतीचे सहा विधानसभा मतदारसंघात आहेत, त्या सर्व मतदारसंघातील आमदारांनी माझं काम केलं आहे, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं होतं. अजितदादांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आमदारांनी चांगल काम केलं. पण काही कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. 100 टक्के कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर संजोग वाघेरेंचे डिपॉझीट जप्त झाले असते. काही कारणास्तव खालचा कार्यकर्ता दुखावला होता. त्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांमुळे मतांवर काही मतांवर परिणाम होईल, असंही श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार गटानं बारणेंचे आरोप फेटाळले
श्रीरंग बारणेंच्या (Shrirang Barne) आरोपांना उत्तर देताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, मावळ लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून काम केलं आहे. तसे आदेश आम्हाला आमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला आदेश दिले होते. आम्ही काम देखील केलं आहे. पार्थ पवार स्वतः याठिकाणी थांबले होते आणि आम्ही प्रचार केला आहे. बारणे यांच्याकडून खापर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या विषयी मतदारांमध्ये नाराजी होती हे त्यांनी आता मान्य केलं पाहिजे, असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मावळ लोकसभा निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची झाली आहे. मावळमध्ये 2019 साली श्रीरंग बारणेंनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यात अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. अशातच यंदाची लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवण्याचा निर्णय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खरं की, बारणेंचे आरोप खरे, हे येणारा काळच सांगेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)