Sudhir Salvi Thackeray Camp: सुधीर साळवींना लालबागचा राजा पावला, उद्धव ठाकरेंनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी
lalbaugcha raja Sudhir Salvi Thackeray Camp: लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांना मोठी जबाबदारी. उद्धव ठाकरे यांनी साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे.

मुंबई: मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुधीर साळवी यांना अखेर लालबागचा राजा पावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अलीकडेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर आता सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने (BMC Election 2025) उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. लालबाग परिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचे सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय समीकरणे साधल्याची चर्चा आहे.
यापूर्वी सुधीर साळवी यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवडी विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळामुळे (Lalbaug Cha Raja) सुधीर साळवी यांच्याभोवती एक वलय निर्माण झाले आहे. गणपतीच्या काळात अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटी हे लालबागच्या दर्शनाला येतात. यावेळी सुधीर साळवी सर्वांचे आदरातिथ्य करताना दिसतात. त्यामुळे सुधीर साळवी यांची चांगलीच 'वट' तयार झाली आहे. विधानसभा निवडणुकीत सुधीर साळवी हे शिवडीतून लढण्यासाठी इच्छूक असताना उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार अजय चौधरी यांच्या पारड्यात दान टाकले होते. त्यावेळी सुधीर साळवी यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी लालबागमधील त्यांच्या कार्यालयासमोर जमून शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे साळवी हे विधानसभेला वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा होती. भाजप आणि शिंदे गट त्यांच्यासाठी गळ टाकून बसल्याचे सांगितले जात होते. परंतु, मातोश्रीवर बोलावून सुधीर साळवी यांची योग्यप्रकारे समजूत काढण्यात आली होती. परिणामी सुधीर साळवी हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले होते. याच निष्ठेचे फळ आता सुधीर साळवी यांना सचिवपदाच्या रुपाने मिळाल्याचे बोलले जात आहे.
सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्षे मानद सचिव आहेत. तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक काही तासांपूर्वी जारी करण्यात आले. राजकारणात जम बसवण्याच्यादृष्टीने सुधीर साळवी यांच्यासाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे. सुधीर साळवी यांच्यावर येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुक नियोजनाची जबाबदारी असल्याची माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीत सुधीर साळवी यांनी केलेल्या भरीव कामाची दखल मातोश्रीने घेतली असल्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटात आहे.
आणखी वाचा























