मोठी बातमी : पवारांच्या खासदारांना कुणी संपर्क साधला, खासदार अमर काळेंनी नाव फोडलं!
Amar Kale: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मी कोणालाही संपर्क साधलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं होतं. त्यानंतर आता खासदार अमर काळेंनी नाव फोडलं आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वगळून पक्षातील इतर सात खासदारांच्या (NCP MP) भेटी घेऊन त्यांना यासंबंधीची ऑफर दिल्याची माहिती होती. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मी कोणालाही संपर्क साधलेला नाही, असं स्पष्टीकरण दिलेलं होतं. त्यानंतर आता खासदार अमर काळेंनी नाव फोडलं आहे.
खासदार अमर काळेंनी कोणाचं नाव सांगितलं?
खासदार अमर काळे यांनी एबीपी माझाला माहिती देताना सांगितलं की, काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या, आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चला असा आग्रह केला होता. जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असं ही त्या म्हणाल्या होत्या. केवळ अमर काळेच नाही तर निलेश लंके, भगरे गुरुजी, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. सोनिया दुहान संपर्क करत होत्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
आम्हाला ऑफर देत असले तरी शरद पवारांसोबत राहणार - सलील देशमुख
या प्रकरणी बोलताना सलील देशमुख म्हणाले, सोनिया दुहान काँग्रेस पदाधिकारी आहेत आणि काम करतायत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी म्हणजेच एनडीएसाठी म्हणजे त्या इंडिया आघाडीत एनडीएसाठी स्लीपर सेलचा काम करतायत का?? आमची आणि काँग्रेसोबत जी समन्वय समिती आहे, त्याच्याकडे सोनिया दुहान यांची तक्रार केली जाईल. आम्हाला ऑफर देत असले तरी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत सुनील तटकरे?
'मी कधीही कुणाशी संपर्क साधलेला नाही. माध्यमांमध्ये माझ्याबाबत सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत', अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवारांच्या खासदारांच्या भेटी घेऊन त्यांना ऑफर दिल्याची माहिती समोर आली होती, त्यावर प्रतिक्रिया देताना तटकरेंनी इन्कार दिला आहे, मी कधीही कोणाला संपर्क साधला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे, तर समोर आलेल्या चर्चा चुकीच्या असल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत - मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क साधला गेला आहे, का त्यांना ऑफर दिली आहे का? याबाबत एबीपी माझाशी बोलताना पक्षाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले, 'प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल. तुतारी गटाचे जे सात- आठ खासदार निवडून आले आहेत. त्यांना जर खरंच आमच्यासोबत यायचं असेल तर सुनील तटकरेंसोबत संपर्क केला असेल. काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येत असतील तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, असं मिटकरी म्हणाले. सात- आठ खासदार येण्यासाठी इच्छूक असतील तर त्याचं स्वागत करतो. निलेश लंके तुमच्यासोबत खोटं बोलत आहेत, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. पक्ष जर मजबूत होत असेल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर तर येणाऱ्यांचं स्वागत आहे, असं अमोल मिटकरी म्हणाले. पक्ष मजबूत झाला पाहिजे, असं अमोल मिटकरींनी सांगितलं. दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर त्या गुलदस्त्यात आहे. ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं मिटकरींनी म्हटलं.