'पुढच्यावेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस...'; अविनाश जाधव यांचं प्रत्युत्तर, मनसे-ठाकरे गट वाद चिघळणार
Shiv Sena vs MNS Thane Rada: संपूर्ण महाराष्ट्रात मनसैनिक त्यांची जागोजागी वाट पाहत आहेत, असं अविनाश जाधव यांनी सांगितले.
Shiv Sena vs MNS Thane Rada: ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाडीवर काल (10 ऑगस्ट रोजी) शेण बांगड्या आणि नारळ फेकल्यानंतर ठाण्यातल्या मनसैनिकांवर आता गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरीकडे ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांच्या विधानावर बोलताना अविनाश जाधव यांनी म्हणाले की, पुढच्या वेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस, मी स्वतः येऊन आंदोलन करेन...त्यासोबतच पक्षप्रमुख शेण खात असताना मी तिथेच उभा होतो, असे प्रत्युत्तर देखील अविनाश जाधव यांनी राजन विचारे यांना दिले. आता हा वाद इथेच थांबवायचा की आणखी वाढवायचा हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असून त्यांना हवे असेल, तर संपूर्ण महाराष्ट्रात मनसैनिक त्यांची जागोजागी वाट पाहत आहेत, असं अविनाश जाधव यांनी सांगितले.
संजय राऊत काय म्हणाले होते?
डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकलं. नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. तुम्हाला विनंती आहे की, पुन्हा काळोखात लपुनछपून असे हल्ले करु नका, समोरून हल्ले करा. तुमच्या घरातही आईवडील, मुलबाळं , तुमची पत्नी हे सगळं पाहत असेल. पण अशा घटनांनी आम्हाला फरक पडत नाही. आमचा ठाण्यातील कार्यक्रम उत्तम झाला. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी उत्तमप्रकारे सुरु आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
राजन विचारे काय म्हणाले?
महिलांना पुढे करून प्रकार घडला, बीडला झालेल्या घटनेचे समर्थन नव्हतंच. ठाण्यात याआधी कधीच असं घडले नाही. महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो अतिशय निंदनीय आहे. मर्द असाल तर समोर या...आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही शांत होतो. तुमच्या दम असेल तर तुम्ही पळून का गेलात?, असा सवाल राजन विचारे यांनी उपस्थित केला. अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली, मुंबईवरुन गाडीत बसून, लपून-थपून...अरे काय तुझं, हे करु-ते करु अशी भाषा वापरता...शिवसैनिकाला अशी भाषा वापरू नका, शिवसैनिक कधीही अंगावर यायला तयार असतात, असं आव्हान राजन विचारे यांनी दिलं.
नेमकं काय घडलं?
राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या टाकल्याची घटना घडली होती. ही गोष्ट मनसेच्या मोठी जिव्हारी लागली. त्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रियाही आल्या. खुद्द राज ठाकरेंनीही यावर प्रतिक्रिया देत, माझ्या नादी लागू नका नाहीतर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलं तर सभाही घेऊ देणार नाहीत असा इशाराच दिला.राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना तशी संधीही मिळाली. शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर मनसेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या.
संबंधित बातमी:
ठाण्यातील राड्यानंतर कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना व्हिडीओ कॉल; मनसैनिकांचा पोलीस स्थानकात जल्लोष