Washim : मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, बंजारा समाजाचे तीन महंत शिवबंधन बांधणार?
Washim News : शिवबंधन सोडून शिंदे गटात सामील झालेले बंजारा समाजातील मोठे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना बंजारा समाजातूनच एक सक्षम पर्याय देण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असल्याची माहिती आहे.
Washim News : शिवसेना (Shiv Sena) सोडून शिंदे गटात (Shinde Group) सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना शह देण्याची तयारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली असून येणाऱ्या काळात पोहरादेवी येथील तीन महंत शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्याचबरोबर हजारो बंजारा बांधव देखील शिवसेनेत सामील होणार असल्याची माहिती आहे. असे झाल्यास संजय राठोड यांच्यापुढे बंजारा समाजातूनच मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
बंजारा समाजातून संजय राठोड यांना पर्याय देण्याची तयारी
राज्यातील सत्ता संघर्षादरम्यान शिवबंधन सोडून शिंदे गटात सामील झालेले बंजारा समाजातील मोठे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना बंजारा समाजातूनच एक सक्षम पर्याय देण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत असल्याची माहिती आहे. मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी बंजारा समाजातील महंतांनाच किंवा त्यांच्या मर्जीतील नेत्याला येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी देण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांचे एक प्रतिनिधी मंडळ पोहरादेवी येथे येऊन महंतांची भेट देखील घेऊन गेले होते. याच भेटीदरम्यान याविषयी चर्चा झाली असल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. पोहरादेवीचे हे तीन महंत कोण या बद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र, पितृपक्ष पंधरवडा असल्याने अद्याप महंतांकडून निर्णय नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पितृपक्ष संपताच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संजय राठोड यांना सक्षम पर्याय देण्याचा उद्धव ठाकरेंचा विचार
बंजारा समाजातील स्व. वसंतराव नाईक, स्व. सुधाकरराव नाईक यांच्यानंतर संजय राठोड यांच्याकडे एक मोठे नेतृत्व म्हणून पाहिले जाते. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलेल्या शक्तिप्रदर्शनातून आला. पोहरादेवी येथे जमलेल्या हजारो बंजारा बांधवांच्या याच गर्दीवर आता डोळा ठेऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना सक्षम पर्याय उभा करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यासाठी ठाकरे यांनी थेट बंजारा समाजातील तीन महंतानाच येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी देण्याची योजना आखली असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्या या खेळीमुळे संजय राठोड यांच्यापुढे आव्हान उभे राहणार हे निश्चित आहे. मात्र, बंजारा समाजाला देखील नवे नेतृत्व मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे मंत्री संजय राठोड यांचा येणारा काळ आव्हानात्मक असेल हे मात्र नक्की.
VIDEO : संजय राठोड यांना धक्का देण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे, तीन महंतांसह हजारो बंजारा बांधव शिवबंधन बांधणार?