Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाची जोरदार तयारी, कल्याण-डोंबिवलीतून 200 हून अधिक बस बुक
Dasara Melava: राज्यभरात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता दसरा मेळाव्यासाठी देखील दोन्ही गटाकडून प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
Dasara Melava: राज्यभरात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता दसरा मेळाव्यासाठी देखील दोन्ही गटाकडून प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुंबई बीकेसी येथे शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीतून तब्बल दहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. यासाठी या कार्यकर्त्यांसाठी दोनशे बस आत्तापर्यंत बुक केल्या आहेत. मात्र आणखी मोठ्या प्रमाणात लोक आम्हाला संपर्क करतात. त्यामुळे आता बसेस कमी पडू लागल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख सचिन बासरे यांनी कल्याणमधून अडीच हजार कार्यकर्ते ट्रेनने शिवाजी पार्क गाठणार असल्याचे सांगितले. तर कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटातील सुमारे 2 हजार ते अडीच हजार कार्यकर्ते व पदाधिकारी देखील ट्रेनने शिवाजी पार्क येथे जाणार असल्याची माहिती ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख सदांनंद थरवळ यांनी दिली.
गेला तीन-चार महिन्यापासून शिवसेनेच्या शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वाद विकोपाला गेला आहे. सत्ता त्यानंतर पक्ष, चिन्ह अशी सुरू असलेली लढाई आता दसरा मेळाव्यापर्यंत पोहोचली आहे. शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वाद पाहता यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार बाबत उत्सुकता होती, मात्र आता दोन्ही गटाकडून दसरा मेळावा घेतला जातोय. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथे होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबई बीकेसी मैदानात होणार आहे.
या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. कल्याण डोंबिवली मध्ये देखील दोन्ही गटातील कार्यकर्ते पदाधिकारी या मेळाव्यासाठी सज्ज झालेत. शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रत्येक ठिकाणी बैठका सुरू असून बीकेसी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवली मधून आत्तापर्यंत 200 बसेस बुक झाल्यात किमान दहा हजार कार्यकर्ते कल्याण डोंबिवलीहून या मेळाव्याला जाणार आहेत. अजूनही लोकांचा संपर्क होतोय. त्यामुळे आम्हाला आता बसेस अपुरा पडू लागल्यात, असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले. तर उद्धव ठाकरे गटातील शहर प्रमुख सचिन बासरे यांनी कल्याण मधून अडीच हजार कार्यकर्ते हे ट्रेनने शिवाजी पार्क येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात जाणार आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी कल्यान ग्रामीण, डोंबिवली मधून देखील दोन ते अडीच हजार कार्यकर्ते ट्रेनने दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे सांगितलं. तसेच यावेळी केवळ शिवसैनिक नाही तर सामान्य नागरिक देखील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यास येणार उत्सुक असल्याचे सांगितले.