Congress President Election: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, सोनिया गांधींनी दिली मंजुरी
Congress President: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी सोमवारी दिल्लीत पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
Congress President: काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानसह आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला आहे. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर हेही पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडूनही परवानगी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शशी थरूर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींकडून मंजुरी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, जर त्यांची (शशी थरूर) इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतो. असं असलं तरी ते सोन्या गांधी यांना कोणत्या संदर्भात भेटले, हे शशी थरूर यांनी स्पष्ट केले नाही. अलीकडेच थरूर यांनी सभापतीपदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. त्याच दरम्यान त्यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट झाली आहे.
दरम्यान, काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यानंतर हा सस्पेंस आणखी वाढला आहे. भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असलेले राहुल गांधी म्हणाले आहेत की, "मी पक्षाध्यक्ष होणार की नाही, हे अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्यावर स्पष्ट होईल. मात्र मी स्पष्टपणे ठरवले आणि मी तेच करेन आणि माझ्या मनात कोणताही भ्रम नाही. ”
Senior Congress leader & MP Shashi Tharoor gets a nod from Congress interim president Sonia Gandhi to contest for the post of the party president, after he reached out to her in a meeting today, citing he can make internal democracy stronger: Sources
— ANI (@ANI) September 19, 2022
(File pics) https://t.co/PzQrMzlbYH pic.twitter.com/cp6GbETPkX
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार असून, 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.