Sharad Pawar: वयाचा उल्लेख करताच शरद पवारांनी तात्काळ जयंत पाटलांना हटकले, म्हणाले, अययय!!!
Pun News: अखेर निलेश लंके पवारांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल, मात्र वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी, कारण काय? निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले आहेत. हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेला बहुप्रतिक्षीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम गुरुवारी पुण्यात पार पडला. अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अखेर शरद पवार गटात घरवापसी केली. यावेळी शरद पवार, निलेश लंके (Nilesh Lanke) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत घडलेला एक प्रसंग सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार यांनी वयाची ऐंशी ओलांडली असली तरी अद्याप ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करतात. हीच बाब जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली. त्यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी तातडीने जयंत पाटील यांना हटकले. आज इतकं वय झालं असेल तरी शरद पवार तरुणांना लाजवेल असं काम करतात, असे जयंत पाटील यांनी म्हणताच पवारांनी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि 'अय.... ' अशी हाक मारत जयंत पाटील यांना थांबवले. शरद पवारांना त्यांचे वय झाले याचा उल्लेख केलेला आवडत नाही, ही बाब जयंत पाटलांच्या चटकन लक्षातही आली. त्यामुळे जयंत पाटील हे शरद पवारांकडे पाहून हसायला लागले आणि मी माझं वाक्य मागे घेतो, असे म्हटले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार हे सध्याच्या काळात किती मेहनत करत आहेत, याचा पाढा वाचला. काल शरद पवार निफाडच्या सभेसाठी नाशिकला गेले होते. त्यानंतर ते रात्री दीड वाजेपर्यंत जळगावातून येणाऱ्या प्रत्येकाला भेटत होते. सकाळी पुन्हा आठ वाजता ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासाठी गेले. त्यानंतर थोडीही विश्रांती न घेता शरद पवार आता इकडे आले आहेत. त्यांचा हा अथक काम करण्याचा स्वभाव सगळ्यांना प्रेरणा देणार आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
निलेश लंके हा संकटाच्या काळात धावून येणारा नेता: जयंत पाटील
जयंत पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांनी यापुढे शरद पवारांच्या विचारांसोबत चालायचे ठरवले आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी लंके यांचे कौतुकही केले. मागच्या काळात निलेश लंके आणि आमची भेट होत नव्हती. आज आमची जिव्हाळ्याने आणि प्रेमाने भेट झाली आहे. निलेश लंके नगरमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. ते सामान्यांना आपला वाटणारा नेता आहेत. संकटाच्या काळात धावून येणारा नेता ही त्यांची ओळख आहे. ते आज शरद पवारांना भेटायला आले आणि त्यांनी इथून पुढे शरद पवार साहेबांच्या विचारधारेने चालण्याचा निर्णय घेतल आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.