Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, चिंता नाही, पण...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. आता या दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले की, काश्मीरमध्ये जे झाले त्या प्रश्नाकडे सगळ्या देशवासीयांनी एका विचाराने सरकारसोबत राहिले पाहिजे, इथं राजकारण आणायचं नाही. अतिरेक्यांनी जी अॅक्शन घेतली ती भारताच्या विरोधी घेतली आहे. देशाच्या विरुद्ध असं कोणी निर्णय घेते तिथं राजकारण करायचे नसते. त्या दृष्टीने आम्ही लक्ष घातले. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
सरकार म्हणायचं दहशतवाद मोडून काढलाय, पण...
सरकारने हे अधिक गांभीर्याने घ्यायला पाहिजे. गेले काही दिवस सरकारच्या वतीने सतत सांगितले जात होते. आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काय चिंता नाही. असं होत असेल तर आनंद आहे. पण घडलेली घटना बघितल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे हे स्पष्ट आहे. ही कमतरता सरकारने घालवायला हवी. सरकारने अधिक गांभीर्याने घ्यावे. सरकार कमतरता आहे हे मान्य करत असेल तर त्यांनी तातडीने पावले टाकावीत. काही कामात आम्हा लोकांचं सहकार्य राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आपण काळजी घ्यायला पाहिजे
शरद पवार पुढे म्हणाले की, इंटेलिजन्स फेल्युअर आहे हे सरळ दिसत आहे. पहलगाम हे त्यातल्या त्यात अधिक सुरक्षित आहे. दोन-तीन महिन्यापूर्वीच मी तिथे जाऊन आलो. सातत्याने आपले लोक तिथे जातात. दहशतवाद्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले, हा जो निष्कर्ष काढला जातो, तो अधिक सावधान करणारा आहे. आपण काळजी घ्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तर पर्यटकांना हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या यामध्ये काय सत्य आहे? याबाबत मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होते, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसते आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
काश्मीरच्या जनतेचं मोठे नुकसान होईल
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेक पर्यटकांनी आपल्या बुकिंग रद्द केल्या आहेत. यामुळे काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, काश्मीरच्या लोकांचे चरितार्थ हे पर्यटनावर आहे. लोक काही दिवस काश्मीरला जाणार नाहीत असेच दिसते. त्यामुळे काश्मीरच्या जनतेचं मोठे नुकसान होईल. पण एक जमेची बाजू घडली आहे, ज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा























