शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
Maharasahtra Politics : शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये सत्तेत जाण्यासाठी चलबिचल सुरु असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता एकीकडे भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब होताना दिसत नाही. तर, दुसरीकडे शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये सत्तेत जाण्यासाठी चलबिचल सुरु असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील आमदार आणि खासदार मंडळीची सत्तेत जाण्यासाठी चढाओढ सुरु असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. सत्तेत जाण्यासाठी शरद पवार गटातील आमदार-खासदार अनेक पर्यायांची चाचपणी करत असल्याची माहिती समोर येत आहे.
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल
महायुती सरकारसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल सुरु असून दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार-खासदार सत्तेत जाण्यासाठी भाजपसोबत जाण्याचा विचार करत आहे. भाजपसोबत जायचं, पण शरद पवार गटाचं अस्तित्व कायम ठेवायचं असं, या गटाचं म्हणणं आहे. तर दुसऱ्या गटाचं मत आहे की, आपण अजित पवारांच्या गटात विलीन होऊन सरकारमध्ये जायचं. सत्तेत जाण्यासाठी या दोन पर्यांयावर शरद पवार गटातील नेत्यांची घालमेल सुरु असल्याची माहिती आहे.
सत्तेत जाण्याच्या हालचाली
दरम्यान, अजित पवार यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी गुरुवारी 84 वा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलासोबत शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बडे नेतेही उपस्थित होते. छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्या दीर्घकाळ चर्चाही झाली.
अजित पवार शरद पवारांच्या भेटीला
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चाही केली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या भेटील कौटुंबिक विषयांसह महायुती सरकार, मंत्रिमंडळ विस्तार अशा विषयांवर चर्चा झाल्याचं अजित पवारांनी नंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं. यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का, अशा चर्चा सुरु झाल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार?
दरम्यान, त्याआधी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतली होती, त्यावेळीही दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. या भेटीमागचं खरं कारणही समोर आलेलं नाही. एकीकडे दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढताना दिसत आहे, तर आता दुसरीकडे सरकारमध्ये जाण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार-खासदार प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :