VIDEO : अपघातावेळी सगळ्यांना चिरडत जाताना बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरु होतं? धक्कादायक CCTV फुटेज
Kurla Bus Accident CCTV Footage : कुर्ला बस अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला.
Kurla Bus Accident Latest Update : कुर्ला बस अपघातात 7 निष्पाप जीवांचा बळी गेला. सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये घडलेल्या भीषण अपघातात कुणी आपली आई, कुणी वडील, कुणी बहिण, तर कुणी भाऊ गमावला. कुर्ला डेपोतून नेहमीप्रमाणे निघालेली बस आपल्याला आपल्या गंतव्य स्थानापर्यंत घेऊन जाईल, या आशेने बसमध्ये प्रवासी चढले. बसवाहकाची तिकीट काढण्याची लगबग सुरु झाली. बसमध्ये चढताच प्रवाशांनी सीट पकडल्या आणि कुणी आपापसांत, तर कुणी फोनवर बोलण्यात मग्न झाले अन् काही जण आपल्या फोनमध्ये डोकी घालून बसले. प्रवासी आपल्या धुंदीत असताना अचानक बसचा वेग वाढला अन् पुढच्या 15 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. आता बस अपघातादरम्यानचा बसच्या आतमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
कुर्ला बस अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज
कुर्ल्यातील भीषण बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुर्ला डेपोतून निघालेली बस पहिल्या स्पीड ब्रेकपर्यंत पोहोचली, तेवढ्यात बसने अचानक वेग घेतला. बसचालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटरवर पाय दिल्याने घात झाला, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने रस्त्यावर चालणारी माणसं, उभ्या असलेल्या रिक्षा यांना सुमारे 250 मीटरपर्यंत फरफटत नेलं. यावेळी बसच्या आतमध्ये नेमकं काय सुरु होतं, याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. कुर्ला बस अपघातात आतपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
सीसीटीव्हीच्या साहाय्याने बसमधील प्रवाशांचा शोध सुरु
कुर्ला बस अपघात प्रकरणी पोलिसांकडून बसमधील सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर जप्त करण्यात आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचा शोध घेणार असून त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. बसमधील प्रवाशांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवत त्यादृष्टीने पुढे तपास करण्यात येणार आहे. अपघात प्रकरणात आतापर्यंत 25 जणांचा जबाब नोंदवण्यात आला असून यामध्ये प्रवासी, प्रत्यक्षदर्शी, जखमी, बेस्ट कर्मचारी आणि परिवहन अधिकारी यांचा समावेश आहे.
बसचालकाला फक्त एक दिवसाचं ट्रेनिंग
आरोपी बसचालक संजय मोरे याच्यावर अल्प प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. आरोपी बसचालकाला इलेक्ट्रीक बस चालवण्याचा अनुभव नव्हता. फक्त एक दिवसाचं ट्रेनिंग मिळाल्याचं बसचालकाचं म्हणणं आहे, तर चालकाने 10 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याचा कंपनीचा दावा आहे. या सर्व बाबींची सध्या पोलिसांकडून पडताळणी सुरु असून तपासात पुढील माहिती समोर येईल.
पाहा बसमधील थरारक व्हिडीओ
Mumbai: CCTV footage from inside the BEST bus involved in the Kurla accident has surfaced
— IANS (@ians_india) December 11, 2024
(Date: 09/12/2024) pic.twitter.com/jJhyfuMTVu