Rohit Pawar: 'बबन गीतेंना अडचणीत आणलं तेव्हा मी वाल्मिक कराडांचं नाव...', रोहित पवारांनी आर.आर.आबा, विलासराव देशमुखांचं नाव घेत मुंडेंना दिला सल्ला
Rohit Pawar: वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर 307 कलम लावण्याची गरज आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळच्या वाल्मिक कराडवरती ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात देखील हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. अशातच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. त्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आर.आर.आबा आणि विलासराव देशमुखांचं नाव घेत मुंडेंना (Dhananjay Munde) राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. हे सगळं होऊ द्या. सहा महिन्यानंतर पुन्हा तुम्ही मंत्रीपद घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
कराडसह इतर आरोपींवर 307 कलम लावण्याची गरज
या प्रकरणात कोणीही राजकीय भूमिका घेऊ नये. देशमुख कुटुंबावर मोठा अन्याय झालेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. गेल्या महिन्याभरात आम्ही कारवाई करू ऐकण्यात येत आहे. पण, कारवाई अद्याप झालेली दिसत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय बोलणं कमी आणि काम करणं जास्त गरजेचं आहे. लवकरात लवकर ज्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या व्यक्तींना ताब्यात घेतलेले आहे, त्यांना खंडणी प्रकरणात ताब्यात घेतलेला आहे, खंडणी मागत असतानाच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे खंडणी प्रकरणात ताब्यात घेतलेले आरोपी आणि त्या कंपनीचा आणि हत्या या प्रकरणात सहभाग असलेल्या वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर 307 कलम लावण्याची गरज आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, देशमुख कुटुंबाला न्याय दिला गेला पाहिजे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे
मी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं होतं...
बबन गीते यांना अडचणीत आणलं होतं. त्यावेळी मी वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं होतं. तिथे सगळे निर्णय वाल्मिक कराड घेतात हे मी सांगत होतो. त्याचवेळी कराडवर कारवाई केली असती तर आज संतोष देशमुख यांची हत्या झालीच नसती. तेव्हा देखील सांगितलं होतं वाल्मिक कराड शिवाय कुठे काही चालत नाही, तिथं निर्णय हे वाल्मिक कराड घेतात. दुर्दैवाने आज देखील आपण त्या बाबतीत पुन्हा चर्चा करतोय. मात्र या प्रकरणात संतोष देशमुख यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा जीव गेलेला आहे. परत एकदा त्याच विषयावर आपण चर्चा करतोय. त्यावेळी जर सरकारने मी जर जे बोलतोय त्यावर कारवाई केली असती. तर संतोष देशमुख जिवंत असले असते. दुर्दैव असं की सरकारने त्याबाबतीत कोणती कारवाई केली नाही. बीडमध्ये वाल्मीक कराड शिवाय कोणता निर्णय घेतला जात नाही. अधिकाऱ्याला आणायचा असेल, अधिकाऱ्याची नियुक्ती करायची असेल, एखादे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल, बिस्किट विकायचे असले तरी वाल्मिक कराडला सांगितल्याशिवाय आपल्याला ते विकता येत नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मराठी शाळेत शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदी चुकीचं स्टेटमेंट...
तर आम्ही असं म्हणत नाही धनंजय मुंडे यांच्यात असतील, आमचं हे म्हणणं आहे. त्यांची नैतिक जबाबदारी आहे. इतकी चर्चा झाली असेल त,र तुम्ही केलं नसावं. पण धनंजय मुंडे यांच्या या कार्यकर्त्यांनी 100% केलं असा आमचं म्हणणं आहे. पण त्यांची नैतिक जबाबदारी आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. जेव्हा आर.आर.पाटील यांच्या बाबतीत एक साधं वक्तव्य त्यांच्याकडून आलं होतं. ते सुद्धा हिंदीत आलं होतं. मराठी शाळेमध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीने हिंदी चुकीचं स्टेटमेंट दिलं. नैतिकता बघता त्यांनी राजीनामा दिला. आमचं इतकचं म्हणणं आहे, त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. हे सगळं होऊ द्या. सहा महिन्यानंतर पुन्हा तुम्ही मंत्रीपद घ्यावं, असं आमच्या सर्वांचा म्हणणं आहे, असंही पुढे ते म्हणालेत.
आर.आर.आबा अन् विलासराव देशमुखांनी नैतिकतेच्या...
धनंजय मुंडे तुम्ही नेते आहात. तुम्ही याच्यामध्ये नसाल देखील, पण तुमचा मित्र याच्यामध्ये अडकलेला आहे. लोकांच्याशी भावना झालेली आहे. सरकारकडून या बाबतीत योग्य प्रकारे शहानिशा केली जाणार नाही यामध्ये कदाचित राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो देशमुख कुटुंबाला न्याय मिळू शकत नाही असं सगळ्यांचं मत होऊ शकतं. त्यामुळे नैतिकच्या आधारावर ज्याप्रकारे विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर फास्टट्रॅक वरती कराड आणि बाकी सहा सात आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात राजकीय वक्तव्य कमी आणि ॲक्शन घ्यावी लागेल असं माझं मत आहे, असंही रोहीत पवारांनी म्हटलं आहे.