Sanjay Raut: संजय राऊतांचं बारामतीत घणाघाती भाषण; मोदींपासून चंद्रकांत पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदेंवर अक्षरश: तुटून पडले
Sanjay Raut: पवार साहेबांनी पक्ष वाढवला त्यांनी पक्ष तुमच्या हातात दिला वाढवायला दिला. अत्रे असते तर म्हणाले असते की 10 हजार वर्षात असा हरामखोर जन्माला आला नाही असे म्हणाले असते, अशा शब्दांत राऊतांनी अजित पवारांना टोला लगावला.
![Sanjay Raut: संजय राऊतांचं बारामतीत घणाघाती भाषण; मोदींपासून चंद्रकांत पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदेंवर अक्षरश: तुटून पडले Sanjay Raut speech at Saswad Baramati slams PM Modi Ajit Pawar Eknath Shinde and Chandrakant Patil Sanjay Raut: संजय राऊतांचं बारामतीत घणाघाती भाषण; मोदींपासून चंद्रकांत पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदेंवर अक्षरश: तुटून पडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/28/eb7bf3ad40cbb731639fe478e9fcdace1714293271988954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सासवड: बारामती लोकसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. गुजरातमधून दोन ऐरेगैरे येतात आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसतात. शरद पवार यांची दिल्लीला कायम भीती वाटत आली आहे. पण आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे आहोत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील, अजित पवार ते एकनाथ शिंदे या सगळ्यांवर तिखट भाषेत टीका केली. राऊतांनी या प्रचारसभेत जाहीरपणे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख 'चंपा', असा करत त्यांची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील सांगतात की, बारामतीत आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी आलो आहोत. 'आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार अजूनही तुमच्या नावाचा दरारा', असे वाक्य राऊतांनी उच्चारताच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
अजित पवार हे अनेक मतदारसंघांमध्ये आपल्या भाषणांमध्ये व्यापाऱ्यांना धमक्या देतात. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधींचा दंड लादला जातो. हा दंड मागे घ्यायचा असेल तर आमच्यासोबत या, आमचं काम करा, असे अजित पवार सांगतात. पण 4 जूननंतर जनताच तुम्हाला बघून घेईल. अजित पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मैदानात उतरुन निवडणूक लढवावी. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. धमक्या देणे हा आमचा जुना धंदा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ते जमणार नाही, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी आमच्याकडे द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी रोज खोटं बोलतात: संजय राऊत
पंतप्रधान मोदी एका महिन्यात 27 वेळा महाराष्ट्रात आले. कारण त्यांना महाराष्ट्राची भीती वाटत आहे. महाराष्ट्र दिल्ली उठवून टाकेल, असे त्यांना वाटते. देशाचे पंतप्रधान गेल्या 10 वर्षांपासून रोज खोटं बोलतात. इतकं खोट बोलणारा पंतप्रधान देशाने पाहिला नव्हता. महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायची, हा उद्योग मोदी आणि शाह यांनी चालवला आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातला झाला होता. महाराष्ट्रावर चाल करुन येणारी व्यक्ती पंतप्रधान असली तरी आम्ही त्यांचा मान ठेवणार नाही. मोदी प्रचारसभेत खोटं बोलतात. त्यांनी मुस्लीम बांधवांविषयी बोलणे शोभते का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
ज्यांनी घरातील मंगळसूत्राचा मान ठेवला नाही, त्यांनी मंगळसूत्राबात बोलू नये. देशातील हुकूमशाही उलथवून टाकली पाहिजे. शरद पवारांचा पराभव करण्यासाठी भाजपने त्यांचं घर फोडलं. मराठी अस्मितेचं रक्षण करणारा शिवसेना पक्ष फोडला. पण त्यामुळे काय वाकडं झालं? आजही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्त्वात आहे. एकनाथ शिंदेंच्या गटाला पक्षाला मी शिवसेना फडणवीस गट म्हणतो. तर अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची,कोणीही सांगेल उद्धव ठाकरेंची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राऊतांची भाजपवर जोरदार टीका
भाजपला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून आधी त्यांनी ठाण्याचा नवरा केला. मग नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा एक नवरा केला. तरीही विकास झाला नाही. तरीही अजित पवार म्हणतात, मी विकास केला. शरद पवार साहेबांनी बारामतीत हे सर्व निर्माण केलं नसतं तर तुम्ही अजूनही बारामतीमध्ये राजदूत मोटारसायकलवरुन दूधच विकत बसला असतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
तुम्ही इकडे मतदानावेळी सुप्रिया सुळे यांच्या नावासमोरचं बटण दाबा. मग 4 जूनला दिल्लीत हार्ट अॅटक येईल. मोदी आता राहत नाही. हे मी गेल्या तीन वर्षांपासून सांगतोय, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)